बालिश आरोप बंद करा आणि कोरोनाकडे लक्ष द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2021 04:06 AM2021-04-19T04:06:37+5:302021-04-19T04:06:37+5:30
- भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील बालिश आरोप बंद करा आणि कोरोनाकडे लक्ष द्या - भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील लोकमत ...
- भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील
बालिश आरोप बंद करा आणि कोरोनाकडे लक्ष द्या
- भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत सर्वसामान्य माणसाला उपचारासाठी तडफडावे लागत आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारने सातत्याने केंद्र सरकारवर बालिश आरोप करणे बंद करून सामान्य माणसाला मदत करावी, असा इशारा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी रविवारी मंत्री नवाब मलिक यांना दिला.
आपले अपयश लपविण्यासाठी सतत केंद्र सरकारवर आरोप करायचे आणि वाद निर्माण करुन कोरोनाच्या संकटापासून जनतेचे लक्ष विचलित करायचे, असे राजकारण महाविकास आघाडीकडून चालू असल्याचा आरोप चंद्रकांत पाटील यांनी केला. सामान्य जनता चहुबाजूंनी संकटात असताना महाविकास आघाडीकडून आरोपांचे राजकारण सुरू आहे. परंतु, राज्य सरकारने आता तरी कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी शक्ती एकवटली नाही तर सामान्य लोकांच्या संतापाचा उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही, असेही पाटील म्हणाले.
नवाब मलिक यांनी रेमडेसिविर औषधाबाबत केलेला आरोप बालिश आणि हास्यास्पद आहे. केंद्र सरकारवर धादांत असत्य आरोप त्यांनी केला. त्यासाठीचे पुरावे मागितले तर त्यांनी ते दिलेले नाहीत. केंद्रावर आरोप केला असताना त्यांनी गुजरात सरकारचा आदेश दाखवला. एखाद्या कंपनीने रेमडेसिविर विकण्यासाठी गुजरात सरकारला परवानगी मागितली तर ते सरकार केवळ त्यांच्या राज्यापुरताच आदेश देऊ शकते. महाराष्ट्र सरकारनेही असाच आदेश दिला आहे. असे असताना नवाब मलिक यांनी दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या आरोपाची केंद्रीय मंत्री मनसुख मांडविया यांनी दखल घेतली आणि माहिती देण्याची विनंती केली. मलिक यांनी माहिती दिलेली नाही. जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी वारंवार ‘आरोप करा आणि पळून जा’, असा प्रकार सुरु आहे. पण आता आम्ही हे प्रकरण धसास लावल्याशिवाय राहणार नाही. नवाब मलिक यांनी केंद्र सरकारवरील आरोप पुराव्यानिशी सिद्ध करावा किंवा माफी मागावी, असेही पाटील म्हणाले.
.....................