वाढत्या बांधकामांना आळा घाला
By admin | Published: February 12, 2016 01:34 AM2016-02-12T01:34:06+5:302016-02-12T01:34:06+5:30
मुंबईमधील कचऱ्याचा प्रश्न दिवसेंदिवस जटिल झाल्याने वाढत्या बांधकामांना आळा घालण्याची आवश्यकता असल्याचे मत नोंदवत हायकोर्टाने मुंबईत सध्या कोणत्या नियमांतर्गत
मुंबई : मुंबईमधील कचऱ्याचा प्रश्न दिवसेंदिवस जटिल झाल्याने वाढत्या बांधकामांना आळा घालण्याची आवश्यकता असल्याचे मत नोंदवत हायकोर्टाने मुंबईत सध्या कोणत्या नियमांतर्गत बांधकामे सुरू आहेत, याची माहिती मुंबई महापालिकेला देण्याचे निर्देश दिले आहेत.
देवनार डम्पिंग ग्राऊंडला आग लागल्याच्या पार्श्वभूमिवर मुलुंड व कांजुरमार्ग डम्पिंग ग्राऊंडच्या सुरक्षेसाठी काय पावले उचलण्यात आली आहेत? अशी विचारणाही उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेकडे केली होती. त्यावर उत्तर देताना महापालिकेने खंडपीठाला सांगितले की, देवनार व अन्य डम्पिंग ग्राऊंडला संरक्षण भिंत घालण्याचे काम सुरु आहे. लवकरच १०० वॉचमनची नियुक्ती करू आणि सर्व डम्पिंग ग्राऊंडजवळ सीसीटीव्ही बसवू. असे प्रकार पुन्हा घडू नयेत, यासाठी सल्लागाराची नियुक्ती केली आहे, अशीही माहिती महापालिकेने न्या. अभय ओक व न्या. सी. व्ही. भडंग यांच्या खंडपीठाला दिली.
मात्र त्यावर खंडपीठाने असमाधान व्यक्त केले. प्रतिज्ञापत्रात कोणत्याच बाबीची पूर्तता करण्यासाठी अंतिम मुदत नमूद दिलेली नाही. तुम्हाला (महापालिका) सगळयाच बाबींचा अभ्यास करण्यासाठी सल्लागार नियुक्त करण्याचे निर्देश दिले होते. केवळ आग लागू नये म्हणून प्रतिबंधात्मक उपाय आखण्यासाठी सल्लागार नेमा, असे म्हटले नव्हेत, असे खंडपीठाने म्हटले. वाढत्या बांधकामांबाबत बोलताना खंडपीठाने म्हटले की,नव्या बांधकामांवर बंदी घालावी लागेल. पुनर्विकास करण्यास परवानगी दिली जाऊ शकते. (प्रतिनिधी)
देवनारच्या बेकायदा झोपड्यांवर कारवाई
आगीच्या घटनांचे तीव्र पडसाद उमटू लागल्यानंतर झोप उडालेल्या पालिका प्रशासनाने अखेर देवनार डम्पिंग ग्राऊंड परिसरातील बेकायदा झोपड्यांवर कारवाईस सुरुवात केली आहे़ दोन दिवसांमध्ये तब्बल २६७ बेकायदा झोपड्यांच्या विळख्यातून डम्पिंग ग्राऊंडची सुटका करण्यात आली आहे़ झोपडी माफियांवर झालेली ही मोठी कारवाई आहे़
देवनार डम्पिंग ग्राऊंडवर आगीने पेट घेण्याचे प्रकार वारंवार घडत असतात़ दोन आठवड्यांपूर्वी डम्पिंग ग्राऊंडमध्ये आगीचा भडका उडाला़ या आगीच्या धुराने संपूर्ण पूर्व उपनगराला वेढले़ याचे तीव्र पडसाद उमटल्यामुळे अखेर पालिका प्रशासनाला याची दखल घेणे भाग पडले़ त्यानुसार पालिकेने बुधवारी पोलिस फौजेसह देवनार डम्पिंग ग्राऊंड परिसरातील झोपड्या उठविल्या़ झोपड्या बांधून विकण्याचा धंदा येथे तेजीत आहे़
अशा शेकडो झोपड्या देवनार डम्पिंग ग्राऊंडच्या आसपास आहे़ तसेच
येथे भंगाराचे बेकायदा गोदामही चालविले जातात़ डम्पिंग ग्राऊंडवरील भंगारासाठी कचऱ्याला आग लावण्याचे प्रकारही सर्रास घडतात़ याबाबत तक्रार आल्यानंतर पालिकेने मोहीमच उघडली आहे़ यामुळे येथील माफियांचे धाबे दणाणले आहे़
अशी झाली कारवाई
पालिकेचे ३० कामगार,
३० पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या मदतीने तीन जेसीबी, तीन डंपरचा वापर करीत ही कारवाई करण्यात आली़
भूमिका स्पष्ट करावी
झोपडपट्ट्यांमुळे मोठ्या प्रमाणावर कचऱ्याची निर्मिती होत होते. झोपडपट्ट्यांचा पुनर्विकासे, हाच तोडगा आहे,’ असे महापालिकेच्या वकिलांनी खंडपीठाला सांगितले. ‘असे असेल तर विकास केल्यानंतर कचरा वाढणार नाही, अशी भूमिका तरी सरकार किंवा महापालिकेने घ्यावी. कोणीतरी भूमिका स्पष्ट करणे आवश्यक आहे,’ असे म्हणत खंडपीठाने या याचिकेवरील सुनावणी तहकूब केली.