दोस्ती रिअॅल्टीचे बांधकाम थांबवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2018 06:01 AM2018-06-30T06:01:50+5:302018-06-30T06:01:53+5:30
वडाळा येथे दोस्ती रिअॅल्टीच्या बांधकामामुळे लॉईड इमारतीची संरक्षक भिंत कोसळल्याने दोस्ती रिअॅल्टीचे बांधकामच थांबविण्यात यावे, अशी मागणी करणारी याचिका दोस्ती ब्लॉसमच्या रहिवाशांनी शुक्रवारी उच्च न्यायालयात दाखल केली आहे.
मुंबई : वडाळा येथे दोस्ती रिअॅल्टीच्या बांधकामामुळे लॉईड इमारतीची संरक्षक भिंत कोसळल्याने दोस्ती रिअॅल्टीचे बांधकामच थांबविण्यात यावे, अशी मागणी करणारी याचिका दोस्ती ब्लॉसमच्या रहिवाशांनी शुक्रवारी उच्च न्यायालयात दाखल केली आहे.
दोस्ती रिअॅल्टीच्या नव्या प्रकल्पाचे बांधकाम लॉईड इमारतीच्या बाजूला सुरू होते. मात्र, खोदकामामुळे २५ जून रोजी येथील जमिनीचे भूस्खलन झाले व लॉईड इमारतीची संरक्षक भिंत कोसळली. या ठिकाणी पार्क करण्यात आलेली वाहने जमिनीच्या ढिगाऱ्याखाली गाडली गेली. दोस्ती ब्लॉसम या इमारतीलाही तडे गेल्याने येथील रहिवाशांनी घाबरून काही काळ इमारत खाली केली. काही वेळानंतर ते परत आले. मात्र, या रहिवाशांनी दोस्ती रिअॅल्टीचे काम थांबविण्यासाठी उच्च न्यायालात धाव घेतली. या याचिकेवरील सुनावणी न्या. अभय ओक व न्या. रियाझ छागला यांच्या खंडपीठापुढे होती.
महापालिकेच्या वतीने ज्येष्ठ वकील अनिल साखरे यांनी हे काम आधीच थांबविल्याची माहिती न्यायालयाला दिली. बांधकाम थांबविले असून सध्या जे बांधकाम करण्यात येत आहे, ते इमारतीच्या सुरक्षेसाठी करण्यात येत आहे. पडलेली संरक्षक भिंत पुन्हा बांधण्यात येत आहे. तसेच इमारतींना धोका निर्माण होऊ नये, यासाठीही अतिरिक्त बांधकाम करण्यात येत आहे,’ अशी माहिती साखरे यांनी न्यायालयाला दिली. त्यावर याचिकाकर्त्यांतर्फे ज्येष्ठ वकील अतुल दामले यांनी आयआयटी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली नुकसान झालेल्या इमारतीच्या दुरुस्तीचे काम करण्यात यावे, अशी विनंती न्यायालयाला केली. त्यावर न्यायालयाने हे काम आयआयटी तज्ज्ञांच्या सल्ल्याने व मार्गदर्शनाने करण्यात यावे, असे म्हणत तज्ज्ञांचे नाव याचिकाकर्ते, महापालिका आणि बिल्डरने सुचवून अंतिम करावे, असे निर्देश दिले.