Join us  

महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाद्वारे मनोरी खाडीतील खारफुटीचा नाश आणि अवैध डंपिंग थांबवा

By मनोहर कुंभेजकर | Published: May 20, 2023 12:06 PM

वॉचडॉग फाउंडेशनची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

मुंबई-महाराष्ट्र मेरिटाईम बोर्ड  मनोरी खाडीवर रो-रो जेट्टी बांधत असून खाडीमध्ये मलबा टाकत आहे ज्यामुळे खारफुटीवर परिणाम होत आहे.त्यांच्या कडे भरतीच्या पॅटर्न आणि अन्य आवश्यक परवानग्या नाहीत.आरटीआय अंतर्गत मिळालेल्या माहितीनुसार राज्य सरकार आणि त्यांच्या एजन्सीद्वारे रो-रो जेट्टीसह विविध पायाभूत प्रकल्पांसाठी कोणताही पर्यावरणीय प्रभाव मूल्यांकन अभ्यास केला गेला नाही. त्यामुळे रोरो जेट्टीच्या नावाने मनोरी खाडीत सुरू असलेल्या खारफुटीचा नाश आणि अवैध डंपिंग त्वरित बंद करण्यात यावे अशी मागणी वॉचडॉग फाउंडेशनचे विश्वस्तअ‍ॅड. गॉडफ्रे पिमेंटा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे ईमेल द्वारे केली आहे.

रो-रो जेट्टी ही दिशाहीन असून धारावी बेटावर बेमानी मालमत्ता धारण करणार्‍या धनदांडग्याच्या फायद्यासाठी  विकासक धारावी बेटच्या विकासाच्या क्षमतेचा फायदा घेत आहे असा ठाम आरोप धारावी बेट बचाव समितीच्या सचिव लुड्स डिसोझा यांनी केला.

धारावी भेटच्या स्थानिकांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा, महाविद्यालय, रुग्णालय, योग्य प्रकारे बांधलेले रस्ते इत्यादी मूलभूत नागरी सुविधा नाहीत, परंतू तलावाच्या सुशोभीकरणासह पायाभूत प्रकल्पांना प्राधान्य दिले आहे. विकासक केंद्रित असलेला अनियोजित विकास पूर्ववत न केल्यास, केवळ धारावी बेटामधील रहिवाशांसाठीच नाही तर मुंबईकरांसाठीही ते आपत्तीजनक ठरेल अशी भिती त्यांनी व्यक्त केली.

 भविष्यात ग्लोबल वॉर्मिंगमुळे समुद्राचे पाणी जर शहरात घुसले तर त्याला रोखण्याचा कोणताही आधार राहणार नाही. समुद्राच्या पाण्याची पातळी वाढत असल्याच्या बातम्यांद्वारे चेतावणी दिली जात असूनही त्याला महापालिका आयुक्तांनीही पुष्टी दिली आहे, तरीही सर्व संबंधितांनी त्याची योग्य दखल घेऊन भविष्यातील परिस्थितीकडे लक्ष ठेवून भविष्यातील विकासात्मक उपक्रमांचे नियोजन करणे गरजेचे असल्याचे मत अ‍ॅड. गॉडफ्रे पिमेंटा यांनी व्यक्त केले.

मनोरी खाडीत प्रवासी जेट्टी शेजारी महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाकडून दगड व माती भरवाचे बांधकाम सुरू असून हे पर्यावरणाच्या दृष्टीने घातक आहे.मनोरी ते चौक हा धारावी बेटाच्या समुद्र व खाडी पाण्याचा व कांदळवन जंगलाने वेढलेला पर्यावरण संपन्न बेट आहे.हा परिसर इको सेन्सिटिव्ह परिसर आहे.त्यामुळे या बेटाच्या पर्यावरण सुरक्षेसाठी आणि येथील भूमीपूत्रांची संस्कृती व परंपरा जपण्यासाठी या बेटावर सुरू असलेले बांधकाम व दगड मातीचा भराव थांबवण्यात यावा अश्या मागणीचे पत्र कालच आम्ही गोराई  पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षकांना दिल्याची माहिती लुड्स डिसोझा यांनी दिली.