रस्त्यांच्या खोदाईला पायबंद; मुंबई महापालिकेकडून १५ कलमी मार्गदर्शक तत्त्वे जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2024 09:22 AM2024-03-02T09:22:31+5:302024-03-02T09:23:42+5:30

रस्ते खोदण्यास बंदी घालतानाच रस्त्याखालील विविध सेवा वाहिन्यांची कामे करण्यासाठी पालिका  ‘डक्ट पॉलिसी’ लागू करणार आहे.

Stop digging of roads; 15-clause guidelines announced by Mumbai Municipal Corporation | रस्त्यांच्या खोदाईला पायबंद; मुंबई महापालिकेकडून १५ कलमी मार्गदर्शक तत्त्वे जाहीर

रस्त्यांच्या खोदाईला पायबंद; मुंबई महापालिकेकडून १५ कलमी मार्गदर्शक तत्त्वे जाहीर

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : विविध कारणांस्तव वारंवार रस्ते खोदले जात असल्याने रस्त्यांची होणारी दुरवस्था आणि खड्ड्यांचा प्रश्न निकालात काढण्यासाठी मुंबई महापालिकेने १५ कलमी मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली आहेत. या तत्त्वांचे  उल्लंघन करून रस्त्यांची कामे झाल्यास कारवाई केली जाणार आहे. काँक्रीटीकरण केल्या जाणाऱ्या रस्त्यांची यादी आणि त्यांचे गुगल लोकेशन ऑनलाइन प्रसिद्ध करावे लागणार आहे.

रस्ते खोदण्यास बंदी घालतानाच रस्त्याखालील विविध सेवा वाहिन्यांची कामे करण्यासाठी पालिका  ‘डक्ट पॉलिसी’ लागू करणार आहे. या धोरणानुसार रस्ते तयार करण्याआधीच रस्त्याखालून जाणाऱ्या वाहिन्या, केबल आणि इतर सुविधा कामांसाठी  जागा तयार करून ठेवावी लागणार आहे. तसे न केल्यास रस्ते खोदणाऱ्यांवर दंडात्मक आणि कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा पालिकेकडून देण्यात आला आहे. 

धोरण कशासाठी?
 महापालिकेच्या अखत्यारित २,०५० किमीचे रस्ते आहेत. त्यांच्या देखभालीसाठी पालिका कोट्यवधी रुपयांचा खर्च करीत आहे. रस्त्यांच्या काँक्रिटीकरणासाठी हजारो कोटी रुपयांचे प्रकल्प राबविले जात आहेत. 
 अनेक भागांत कामे सुरूही झाली आहेत. रस्त्यांचे होणारे खोदकाम हा पालिकेपुढील डोकेदुखीचा विषय आहे. 
 विविध सेवा वाहिन्यांच्या कामासाठी अनेकदा नवा तयार केलेला रस्ताही खोदावा लागतो. मात्र, काम झाल्यानंतर तो  पूर्ववत केला जात नाही. त्यामुळेच सेवा वाहिन्यांसाठी, दुरुस्तीसाठी रस्ता पूर्ण न खोदता विशिष्ट भागातच ही  कामे व्हावीत, या दृष्टीने नवे धोरण आखण्यात आले आहे.

 नव्या धोरणानुसार... 
 काँक्रीट रस्त्याच्या कामात ह्युम पाइप टाकण्याला बंदी घालण्यात आली आहे. 
 रस्त्याच्या कडेला ५० मीटरपर्यंत आरसीसी डक्ट टाकणे, रस्त्याच्या खालून केबल टाकण्यासाठी सुविधा करणे
 सर्व भूखंडांच्या सीमांना गटार रस्त्यांची जोडणी द्यावी, रस्त्याची दुरुस्ती करण्याआधी विविध विभागात योग्य समन्वय असावा.
 काँक्रिटीकरण होणाऱ्या रस्त्यांची यादी आणि त्यांचे गुगल लोकेशन ऑनलाइन प्रसिद्ध करावे लागणार आहे
 सार्वजनिक सूचना देऊन, नागरिकांना विनंती करून पाणी, गटार दुरुस्तीचे नवे कनेक्शन घेऊन रस्ता दुरुस्तीचे काम करावे.
 रस्ता सुधारणा कामासोबत संबंधित विभागात पथदिव्यांची सुविधा करणे. 
 कामाशी संबंधित असणाऱ्या साइट अभियंत्यांनी सर्व सेवा वाहिन्या डक्टमध्ये सामावून घेतल्या जातील, याची खबरदारी घ्यावी.

Web Title: Stop digging of roads; 15-clause guidelines announced by Mumbai Municipal Corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.