मुंबई : सरकारी विमा उद्योगामध्ये भागभांडवल वाढविण्याच्या धोरणाखाली शेअरबाजारात नोंदणी करण्यासाठी केंद्र सरकारने नवे धोरण आणले आहे. त्यास विमा उद्योगातील कर्मचाऱ्यांच्या सर्व संघटनांनी एकत्रित येऊन विरोध केला आहे. आॅल इंडिया जॉइंट अॅक्शन कमिटीच्या नावाखाली सर्व संघटनांनी एकत्र येत बुधवारी आझाद मैदानात धरणे दिले.कमिटीचे सहनिमंत्रक ललित सुवर्णा यांनी सांगितले की, सरकारच्या निर्गुंतवणूक धोरणाबद्दल निषेध नोंदवण्यासाठी देशभरात गेल्या महिन्याभरापासून निदर्शने सुरू आहेत. बुधवारी संपूर्ण देशभर धरणे आंदोलन झाले. स्पर्धात्मक विमा उद्यागामध्ये सरकारी विमा कंपन्यांचे एकत्रीकरण करून मजबुतीकरण करण्याची संघटनेची प्रमुख मागणी आहे. मुळात देशातील नागरिकांना सामाजिक सुविधांचा लाभ मिळावा म्हणून पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी विमा क्षेत्राचे राष्ट्रीयीकरण केले होते. मात्र निर्गंुतवणूक करून सरकार मूळ उद्देशापासूनच फारकत घेतल्याचा आरोप ललित यांनी केला. दरम्यान, विमा कर्मचाऱ्यांनाही निवृत्तिवेतनाचा पर्याय उपलब्ध करण्याची मागणी कमिटीने केली आहे. (प्रतिनिधी)
विमा उद्योगातील निर्गुंतवणूक थांबवा!
By admin | Published: May 04, 2017 4:52 AM