महागड्या गाड्यांमधून फिरणे बंद करा,दिखाऊपणा करु नका; जे. पी. नड्डा यांनी सुनावले खडे बोल
By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2024 09:54 AM2024-02-22T09:54:14+5:302024-02-22T09:55:01+5:30
सत्तेत असलेली बडेजावू दाखवणारी माणसे आली आहेत असे मुळीच वाटता कामा नये, असेही जे.पी. नड्डा यांनी बजावले.
मुंबई: देशात एनडीए ४०० पार करण्यासाठी मोदी सरकार तिसऱ्यांदा सत्तेवर आणण्यासाठी पूर्ण ताकदीने कामाला लागा, असे आवाहन भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी मुंबईतील भाजपा कार्यकर्ता मेळाव्यात केले.
जे. पी. नड्डा यांनी यावेळी पदाधिकाऱ्यांना खडे बोल सुनावले. महागड्या गाड्यांमधून फिरणे बंद करा. सत्तेत आहात तर नम्र रहा, दिखाऊपणा करू नका, असे खडे बोल जे.पी. नड्डा यांनी सुनावले. सत्ता आली की अनेकांचे तंत्र बिघडते. भाजपाचे नेते, कार्यकर्ते त्याला अपवाद असले पाहिजेत, अशा सूचनाही जे.पी. नड्डा यांनी दिल्या.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारने गेल्या दहा वर्षात केलेल्या अनेक कामांची शिदोरी आपल्याजवळ आहे. सामान्य माणसांना या कामगिरीविषयी साध्या सोप्या भाषेत सांगितले पाहिजे. त्यांच्या वस्त्यांमध्ये तुम्ही जाल तेव्हा सत्तेत असलेली बडेजावू दाखवणारी माणसे आली आहेत असे मुळीच वाटता कामा नये, असेही जे.पी. नड्डा यांनी बजावले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील विकसित भारताचा १० वर्षांचा काळ आपण पाहिला हे आपले सौभाग्य आहे. ही लोकसभेची लढाई केवळ जिंकण्यासाठी नाही तर मोठ्या फरकाने आपल्या जागा निवडून आणण्यासाठी आहे. काश्मीरमधील ३७० कलम हटविणे हा मोदी सरकारसाठी भावनात्मक विषय असून त्याच आधारावर भाजपाच्या देशभरात ३७० जागा निवडून आणायच्या आहेत, असंही जे.पी. नड्डा यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना सांगितले.
Our @BJP4India National President @JPNadda ji addressing and interacting with karyakartas and Mumbaikars in Mumbai.
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) February 21, 2024
Do watch!#MumbaiWelcomesNaddajihttps://t.co/1k9ELMfsMu
दहा वर्षे ट्रेलर होता, पिक्चर अभी बाकी है- देवेंद्र फडणवीस
पंतप्रधान मोदींनी मजबूत भारत जगासमोर आणला. मेट्रो, वंदे भारत ट्रेन, रस्ते या विकासकामांबरोबरच शेतकरी, महिला आणि तरुणांसाठी काम करून एक मजबूत भारत घडवला. विकासाची ही १० वर्षे फक्त्त ट्रेलर होता. पुन्हा एकदा मोदी सरकार सत्तेत येणार असून छत्रपती शिवरायांच्या प्रेरणेने पुढील पाच वर्षे ही देशाला प्रगतीच्या वाटेवर अधिक पुढे नेणारी असतील, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंवरही टीका केली. ते म्हणाले, २५ वर्षात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने मुंबईकरांसाठी केलेले काम दाखवा. मुंबईची मेट्रो, कोस्टल रोड करण्यासाठी आम्हाला सत्तेत यावे लागले, धारावीचा प्रकल्प हे करू शकले नाहीत. हे करण्यासाठी भाजप आणि मोदींना सत्तेत यावे लागले. आता उद्धव ठाकरे भाषणाला उभे राहिले की म्हणतील मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचा डाव आहे, पण कुणाच्या बापाच्या बापालाही ते जमणार नाही.