मुंबई : मुंबई आणि महानगर क्षेत्रातील ‘स्कायवाॅक’ प्रकल्पांना स्थगिती देण्याची मागणी काँग्रेस नेते आणि मुंबई शहराचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. स्कायवाॅकचा पांढरा हत्ती पोसणे बंद करावे. मुंबईला स्कायवाॅकची खरीच आवश्यकता आहे का, याची तज्ज्ञ संस्थेमार्फत पाहणी करण्याची मागणीही शेख यांनी केली आहे.
अस्लम शेख यांच्या नेतृत्वाखाली मालाड पूर्वेतील स्कायवाॅक विरोधात स्थानिक रहिवासी आणि दुकानदारांनी काही दिवसांपूर्वी निदर्शने केली होती. याविरोधानंतर मुंबई उपनगरचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी पालिकेच्या स्कायवाॅक प्रकल्पाला स्थगिती दिली होती. त्यानंतर आता मंत्री शेख यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना पत्र पाठवून स्कायवाॅक उभारणीच्या धोरणाचाच पुनर्विचार करण्याची मागणी केली आहे.
कोणत्याही नियोजनाशिवाय स्कायवाॅक उभारले गेले आहेत. लोकांचा वापरच नसल्याने अनेक स्काॅयवाॅक प्रशासनासाठी पांढरा हत्ती ठरत आहेत. त्यामुळे पालिकेसह एमएमआरडीए उभारणीच्या प्रकल्पांना तात्काळ स्थगिती द्यावी. तसेच आयआयटी किंवा व्हीजेटीआयच्या तज्ज्ञ प्राध्यापकांसह नगर विकास विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवांच्या समितीमार्फत मुंबईत खरेच स्कायवाॅकची गरज आहे का, याचा अभ्यास करावा, अशी मागणी अस्लम शेख यांनी केली आहे.
.........
करदात्यांच्या पैशांच्या उधळपट्टीची प्रतीक
मुंबईतील बहुतांश स्कायवाॅक हे नियोजनशून्य विकासाचे, करदात्यांच्या पैशांच्या उधळपट्टीची प्रतीक बनत आहे. ‘एमएमआरडीए’ मुंबईत २३ स्कायवाॅक उभारले. त्यासाठी ७०० कोटींचा खर्च करण्यात आला, तर देखभालीसाठी दरवर्षी अडीच कोटींचा निधी खर्चिला जातो. जिथे गरज नाही, स्थानिक दुकानदार, रहिवाशांसह लोकप्रतिनिधींचा विरोध असतानाही मुंबई महापालिका स्काय वाॅक उभारत आहे. यातील अनेक स्काॅयवाॅक हे अंमली पदार्थांसह असामाजिक तत्त्वांसाठी आसरा बनले असल्याचा आरोप अस्लम शेख यांनी आपल्या पत्रात केला आहे.