दिव्यांग डब्यातील घुसखोरी थांबवा!, तक्रारी प्रलंबित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2018 05:43 AM2018-12-03T05:43:56+5:302018-12-03T05:43:59+5:30
मुंबईत उपनगरीय मार्गाने प्रवास करणे हे सर्वसामान्य, धडधाकट नागरिकांसाठी एक प्रकारे दिव्य आहे.
मुंबई : मुंबईत उपनगरीय मार्गाने प्रवास करणे हे सर्वसामान्य, धडधाकट नागरिकांसाठी एक प्रकारे दिव्य आहे. अशा परिस्थितीत दिव्यांग प्रवाशांना प्रवास करताना किती त्रास सहन करावा लागत असेल, याची कल्पना करणे कठिण नाही. रेल्वे प्रशासनाने दिव्यांगांच्या सोयीसाठी विशेष डबा दिलेला असला, तरी त्यामध्ये इतर प्रवासी सातत्याने घुसखोरी करत असल्याने दिव्यांगांना त्याचा त्रास होत आहे. प्रशासनाने असे प्रकार रोखून न्याय द्यावा, अशी मागणी दिव्यांग सेनेतर्फे करण्यात आली आहे.
दिव्यांग प्रवाशांसाठी राखीव असलेल्या डब्यातून इतर प्रवासी प्रवास करत असताना त्याची तक्रार करण्यासाठी दिव्यांगांनी मध्य रेल्वेच्या १८२ या हेल्पलाईनवर वर्षभरात ९४११ कॉल केले होते. त्यापैकी ८७८३ कॉलना प्रतिसाद देण्यात आला व केवळ ४१६३ जणांविरोधात कारवाई करण्यात आली, असे दिव्यांग सेना सामाजिक संस्थेचे सचिव नितीन गायकवाड यांना माहिती अधिकार कायद्यान्वये विचारलेल्या प्रश्नांच्या उत्तरात रेल्वे सुरक्षा दलातर्फे सांगण्यात आले आहे. याचाच अर्थ तब्बल निम्यापेक्षा जास्त म्हणजे ५२४८ तक्रारींवर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही हे सिध्द होते, असे गायकवाड म्हणाले. पश्चिम रेल्वेच्या हद्दीत १६०६ कॉल करण्यात आले सर्व कॉलना उत्तर देण्यात आले व त्यापैकी १३६९ तक्रारींची दखल घेत कारवाई करण्यात आली, अशी माहिती देण्यात आली. त्यामुळे दिव्यांगांच्या डब्यातून प्रवास करणाऱ्या व्यक्तींमध्ये प्रशासनाबाबत धाक नसल्याची भावना निर्माण होत असल्याकडे गायकवाज यांनी लक्ष वेधले.
>सीसीटीव्ही नाहीत
दिव्यांगांच्या डब्यात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचे निर्देश न्यायालयाने दिलेले असतानााही अद्याप त्याची अंमलबजावणी करण्यात आलेली नाही.
दिव्यांगांच्या डब्यातून प्रवास करणाºयांमध्ये सर्वात जास्त प्रमाण पोलीस, महिला, तृतीयपंथी व ज्येष्ठ नागरिकांचे असल्याचे निरीक्षण गायकवाड यांनी नोंदवले आहे.
धडधाकट प्रवासी या डब्यात घुसल्यास त्यांना बाहेर काढणे शक्य होते मात्र या वर्गातील प्रवाशांना बाहेर काढणे दिव्यांगांना सहज शक्य होत नाही याकडे त्यांनी लक्ष वेधले.
दिव्यांग दिवसाचे औचित्य साधून रेल्वे प्रशासनाने याबाबत कार्यवाही करावी, अशी मागणी दिव्यांगांमधून केली जात आहे.