‘हिंदुंवरील अन्याय त्वरित थांबवा’
By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2019 06:00 AM2019-05-30T06:00:18+5:302019-05-30T06:00:38+5:30
हिंदुंवरील अन्याय थांबला पाहिजे, जर असे झाले नाही, तर येत्या निवडणुकीत योग्य तो धडा शिकविल्याशिवाय हिंदू शांत बसणार नाही, असा इशारा हिंदू जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड संघटक सुनील घनवट यांनी दिला.
मुंबई : हिंदुंवरील अन्याय थांबला पाहिजे, जर असे झाले नाही, तर येत्या निवडणुकीत योग्य तो धडा शिकविल्याशिवाय हिंदू शांत बसणार नाही, असा इशारा हिंदू जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड संघटक सुनील घनवट यांनी दिला. संजीव पुनाळेकर यांना अटक करून हिंदुत्वाचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे घनवट म्हणाले.
मुंबई मराठी पत्रकार संघ येथे बुधवारी समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी पत्रकार परिषद घेतली. पोलीस कोठडीत मारहाण करून आरोपीकडून जबाब घेऊन संजीव पुनाळेकर यांना अटक केली. ही अटक वकिलांचा अधिकार आणि स्वातंत्र्यावर आघात आहे. हिंदुत्वाचा आवाज दाबण्यासाठी संजीव पुनाळेकर यांच्यावर कारवाई केली आहे. यामुळे हिंदू संघटना संतप्त झाल्या असल्याचा दावा त्यांनी केला.
लष्कर-ए-हिंद संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष ईश्वरप्रसाद खंडेलवाल म्हणाले की, डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणात खऱ्या आरोपींना सोडून निरपराध व्यक्तींना अटक करण्यात येत आहे. अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांना अटक करणे अत्यंत धक्कादायक आहे. हिंदू आणि हिंदुत्वनिष्ठ संघटनांना बदनाम करण्यात येत आहे, असे खंडेलवाल म्हणाले.