Join us

एअर इंडिया कर्मचाऱ्यांवर होणारा अन्‍याय थांबवा; खासदार किर्तीकरांचे पत्र

By मनोहर कुंभेजकर | Published: August 03, 2023 12:54 PM

खासदार गजानन कीर्तिकर यांच्‍या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने घेतली एअर इंडियाचे मुख्‍य कार्मिक अधिकाऱ्यांची भेट

मुंबई : एअर इंडिया कंपनी टाटाने हस्‍तांतरीत केल्‍यानंतर एअर इंडिया कर्मचारी व कर्मचा-यांच्या सहकारी बँकेवर टाटा व्‍यवस्‍थापनाच्‍या संचालकांकडून कर्मचारी धोरणाच्‍या विरोधात केन्‍द्रीय गृहमंत्री अमित शहा यांना भेटून खासदार व शिवसेना संसदीय पक्षाचे नेते गजानन कीर्तिकर यांनी निवेदन सादर केले. या विषयावर एअर इंडियाचे मुख्‍य कार्मिक अधिकारी  सुरेश त्रिपाठी यांना भेटून अन्‍यायाबद्दल शिवसेनेच्‍या शिष्‍टमंडळाने सविस्‍तर चर्चा करून कर्मचा-यांवर होणा-या अन्‍याय तात्‍काळ थांबविण्‍याची मागणी केली. 

खासदार गजानन कीर्तिकर यांच्‍या नेतृत्‍वाखाली शिवसेनेच्या लोकसभेचे शिवसेना गटनेते राहुल शेवाळे, खासदार कृपाल तुमाने, एव्हिएशन इंडिस्‍ट्री एम्‍प्‍लॉई गिल्‍डचे सरचिटणीस  जॉर्ज अब्राहम, एअर इंडिया कॉर्पोरेशन एम्‍प्‍लॉईज बँकेचे अध्‍यक्ष  मिलींद घाग, बँकेच्‍या मुख्‍य कार्यकारी अधिकारी समृध्‍दी घोसाळकर यांच्‍या शिष्‍टमंडळाने एअर इंडियाचे मुख्‍य कार्मिक अधिकारी  सुरेश त्रिपाठी यांच्‍याशी सविस्‍तर चर्चा करून या मागण्‍यांवर तात्‍काळ अंमलबजावणी करावी. अन्‍यथा कर्मचा-यांना आपल्‍या न्‍याय्य मागण्‍यांसाठी आंदोलन करावे लागेल असा इशारा खासदार गजानन कीर्तिकर यांनी दिला.त्यांनी याबाबत लोकमतला सविस्तर माहिती दिली.

एअर इंडियाच्‍या कर्मचा-यांची ७० वर्षापासून सहकारी बँक कार्यरत आहे. या बँकेच्‍या विमानतळ परिसरातील विविध शाखांच्‍या माध्‍यमातून कर्मचा-यांना विविध बँकींग सेवा पुरविल्‍या जातात. ना नफा, ना तोटा या धर्तीवर बँक कर्मचा-यांना कल्‍याणकारी सेवा पुरवित आहे. टाटाने एअर इंडिया हस्‍तांतरीत केल्‍यानंतर व्‍यवस्‍थापनाने बँकेकडून लाखो रूपये भाडे आकारण्‍यास सुरूवात केली आहे. तसेच बँकेचे कर्मचारी कर्जदार जे आहेत त्‍यांची कर्जवसूली व्‍यवस्‍थापनाने करण्‍याची थांबवली आहे. या सुविधा पूर्ववत जशा चालू होत्‍या तशाच ठेवाव्‍यात अशी मागणी शिष्‍टमंडळाने केली. 

एअर इंडिया कर्मचा-यांना व्‍हीआरएसच्‍या नावाखाली व्‍यवस्‍थापनाकडून दबाव आणला जात आहे, तो तात्‍काळ थांबविण्‍यात यावा. एअर इंडियाच्‍या कॅन्‍टीनमधील ३० कर्मचा-यांना कॅन्‍टीन बंद करून सेवेतून काढून टाकण्‍यात आले आहे, त्‍यांना इतर विभागात समाविष्‍ट करून घ्‍यावे तसेच एअर इंडियाच्‍या अन्‍य खात्‍यातील अतिरिक्‍त कर्मचा-यांना देखील समाविष्‍ट करण्‍यात यावे अशीही मागणी यावेळी करण्‍यात आली. एअर इंडिया कॉलनीतील वास्‍तव्‍यास असणा-या एअर इंडिया कर्मचा-यांवर कॉलनी रिकामी करण्‍याची सक्‍ती करण्‍यात येत आहे व त्‍यांच्‍यावर दंडात्‍मक कारवाई केली जाते, ती तात्‍काळ थांबवावी व वसुल केलेली दंडात्‍मक भाडे कर्मचा-यांना विनाविलंब परत करण्‍यात यावी अशी मागणी खासदार कीर्तिकर यांनी यावेळी केली.

टॅग्स :गजानन कीर्तीकरएअर इंडियाविमान