"कुणब्यांचे दाखले देणे बंद करा", नाहीतर; प्रकाश शेंडगेंचा मुख्यमंत्र्यांना इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2023 04:00 PM2023-11-17T16:00:33+5:302023-11-17T16:03:13+5:30

छगन भुजबळ यांच्या नेतृत्त्वात ओबीसी नेते आज अंबडमध्ये जमले आहेत.

``Stop issuing Kunabi cast certificates to maratha'', otherwise; Prakash Shendge's warning to the Chief Minister Eknath Shinde on maratha reservation | "कुणब्यांचे दाखले देणे बंद करा", नाहीतर; प्रकाश शेंडगेंचा मुख्यमंत्र्यांना इशारा

"कुणब्यांचे दाखले देणे बंद करा", नाहीतर; प्रकाश शेंडगेंचा मुख्यमंत्र्यांना इशारा

जालना/मुंबई - राज्यात मराठा आणि ओबीसी वाद आता उघड झाला आहे. मराठा आरक्षणावरून एकीकडे मनोज जरांगे पाटील दौरा करत असताना दुसरीकडे ओबीसी नेत्यांनीही कंबर कसली आहे. मराठा समाजाला आरक्षण द्या परंतु ओबीसी कोट्यातून नको अशी भूमिका ओबीसी नेत्यांनी घेतली आहे. मंत्री छगन भुजबळही या मागणीसाठी आक्रमक झाले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर आज अंबड इथं ओबीसी समाजाचा मेळावा होत आहे. या मेळाव्यात ओबीसी नेत्यांनी जोरदार हल्लाबोल करत मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीका केली. तसेच, राज्य सरकारला इशाराही दिला. माजी मंत्री प्रकाश शेंडगे यांनीही पुन्हा एकदा सरकारला इशारा दिला आहे. 

छगन भुजबळ यांच्या नेतृत्त्वात ओबीसी नेते आज अंबडमध्ये जमले आहेत. येथील मंचावरुन त्यांनी जरांगे पाटलांना आणि मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यास स्पष्ट विरोध केला. जरांगे पाटील, सभा मोठ्या घेतल्यानं आरक्षण मिळत नसतं. तुम्ही भुजबळांकडे या ते तुम्हाला आरक्षणाचा मार्ग दाखवती, असे म्हणत प्रकाश शेंडगे यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर निशाणा साधला. तसेच, आजही त्यांनी मराठा नेत्यांना इशारा दिला. तुम्ही १ भुजबळ पाडाल, तर आम्ही १६० मराठा आमदार पाडू, असे शेंडगे यांनी म्हटले. 

भुजबळ जरी म्हातारे झाले असले तरी ते सिंह आहेत. एका फटक्यात तुमच्यासारखे ५० मातीमोल करायची ताकद भुजबळांच्या पंजामध्ये आहे. प्रकाश शेंडगेंसारखे अखंड शिलेदार भुजबळसाहेबांच्या पाठिशी आहेत. त्यामुळेच, महाराष्ट्रात आता ओबीसींची सत्ता आणल्याशिवाय हा समाज स्वस्थ बसणार नाही, असे म्हणत शेंडगे यांनी भूमिका स्पष्ट केली. तसेच, कुणबी समाजाला देण्यात येत असलेले ओबीसी प्रमाणपत्र तात्काळ थांबवा, अशी मागणीही त्यांनी केली. कुणब्यांचे दाखले ताबडतोब बंद करा, नाहीतर २०२४ मध्ये सरकारला कुठं पाठवायचं हे ओबीसी समाज ठरवेल, असा इशाराच शेंडगे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं नाव घेऊन दिला. दरम्यान, छगन भुजबळ, विजय वडेट्टीवार, गोपीचंद पडळकर यांसह अनेक ओबीसी नेते या व्यासपीठावर उपस्थित होते. 

आम्ही १६० मराठा आमदार पाडू

छगन भुजबळ यांनी ओबीसींच्या बाजूने आवाज उठवला तेव्हापासून प्रस्थापित मराठा समाजाने खालच्या पातळीवर त्यांच्यावर टीका केली. इतकेच नाही तर एकही मराठा त्यांना मतदान देणार नाही अशी भाषा करू लागला. यापूर्वी असे कधी नव्हते. भुजबळांच्या मतदारसंघात केवळ मराठा नाही, तर दलित, धनगर, मुस्लीम इतर सर्व जातीची माणसे आहेत. मराठा नाही केले तरी बाकीचे मतदान करणार आहे. जर भुजबळांना पाडण्याची भाषा होत असेल तर राज्यात ओबीसी समाजही ६० टक्के आहे. प्रत्येक मतदारसंघात ओबीसी समाज आहे. जर तुम्ही एक भुजबळ पाडणार असाल तर ओबीसी तुमचे १६० आमदार पाडल्याशिवाय राहणार नाहीत, असा इशारा प्रकाश शेंडगेंनी दिला होता.

Web Title: ``Stop issuing Kunabi cast certificates to maratha'', otherwise; Prakash Shendge's warning to the Chief Minister Eknath Shinde on maratha reservation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.