मुंबई : महिला डब्यात पुरुष घुसखोरी करत असून, त्यामुळे प्रवास करणे कठीण झाल्याचे महिला प्रवाशांनी सांगितले आहे. मध्य रेल्वे आरपीएफने जागतिक महिला दिनी महिलांशी संवाद साधला. त्या वेळी पुरुषांची, तसेच गर्दुल्ले आणि भिकाऱ्यांची घुसखोरी थांबविण्याची मागणी करण्यात आली. पहाटे किंवा रात्री महिला डब्यातून प्रवास करताना महिलांना असुरक्षित वाटू लागले आहे. चोऱ्या, हल्ले, विनयभंगाचे प्रकार वाढले आहेत. गर्दीच्या वेळी पुरुष फेरीवाले त्रासदायक ठरत आहेत. काही वेळा सुरक्षा नसल्याचे पाहून काही पुरुषही महिला डब्यातूनही प्रवास करतात, अशा तक्रारी महिलांनी केल्या. अशा वेळी महिला प्रवाशांकडून १८२ या हेल्पलाइनवर फोन करून मदत मागण्यात येते आणि त्याची दखल घेत, आरपीएफच्या महिला ‘शक्ती’पथककडून कारवाई केली जाते, अशी माहिती मध्य रेल्वे आरपीएफने दिली. २०१५मध्ये महिला डब्यात घुसखोरी करणाऱ्या २९ हजार २१0 पुरुष प्रवाशांवर कारवाई करण्यात आली आहे, तर २०१६च्या जानेवारी आणि फेब्रुवारीत मिळून ३ हजार २५३ पुरुषांवर कारवाई केल्याची माहिती, मध्य रेल्वे आरपीएफचे वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त सचिन भालोदे यांनी दिली. भिकारी आणि तरुण मुलांनाही महिला डब्यातून आरपीएफकडून बाहेर काढण्यात आले आहे. २0१५मध्ये १५ हजार ५२८ जणांना डब्यातून बाहेर काढले, तर २0१६च्या जानेवारीत १,८६६ आणि फेब्रुवारीत १,८२९ जणांना डब्यातून बाहेर काढण्यात आल्याची माहिती देण्यात आली. आरपीएफने कल्याण, डोंबिवली, सीएसटी स्थानकांवर महिला प्रवाशांशी संवाद साधला. (प्रतिनिधी)
पुरुषांची घुसखोरी थांबवा
By admin | Published: March 09, 2016 4:34 AM