मुंबई - भाजपा सरकारने अनावश्यक करांच्या नावाखाली सामान्य जनतेवर इंधन दरवाढ लादली आहे. पेट्रोल, डिझेलचे दर कमी करून जनतेची पिळवणूक थांबवा अन्यथा जनता भाजपाला सत्तेतून बाहेर फेकल्याशिवाय शांत बसणार नाही, असा इशारा मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी दिला. मुंबई काँग्रेसतर्फे इंधन दरवाढीविरोधात महालक्ष्मी रेसकोर्स ते गिरगाव चौपाटी दरम्यान सायकल रॅली काढण्यात आली, त्या वेळी ते बोलत होते.देशभरातील जनतेला पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीची झळ बसत आहे. मात्र, यात सर्वाधिक त्रास मुंबईकरांना सहन करावा लागत आहे. संपूर्ण भारतात मुंबईकरांनाच पेट्रोल-डिझेलसाठी सर्वाधिक रक्कम मोजावी लागत आहे. मुंबईमध्ये पेट्रोलचा दर ८१ रुपये प्रति लीटर आणि डिझेलचा दर ६८ रुपये प्रति लीटर आहे. कच्च्या तेलाच्या किमती जागतिक बाजारपेठेत कमी असतानासुद्धा भरमसाट कर लावून हा भाव वाढवण्यात आला आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला कात्री बसत आहे. आज सर्व वस्तूंवर जीएसटी लावला जातो. फक्त पेट्रोलियम पदार्थांवर जीएसटी नाही. जीएसटी लागू झाल्यास नागरिकांना हा अनावश्यक कर द्यावा लागणार नाही. जे पेट्रोल आज ८१ रुपयांना मिळत आहे तेच ५० ते ५५ रुपये प्रति लीटरला मिळेल. त्यामुळे भाजपा सरकारने पेट्रोल, डिझेल आणि पेट्रोलियम पदार्थांचा जीएसटीमध्ये समावेश करावा, अशी मागणी निरुपम यांनी केली.देशवासीयांना दिलेले आश्वासन भाजपा सरकार पाळू शकले नाही. त्यामुळेच भाजपाने जाती-धर्माचे राजकारण सुरू केले आहे. जाती-धर्माच्या नावावर लोकांमध्ये फूट पाडण्याचे काम सरकार करत आहे, असा आरोपही निरुपम यांनी केला. या सायकल मोर्चामध्ये निरुपम यांच्यासह मुंबई काँग्रेसच्या महिला अध्यक्षा अजंता यादव, माजी आमदार चरणसिंग सप्रा, मुंबई काँग्रेसचे सरचिटणीस भूषण पाटील, काँग्रेसचे आजी-माजी नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते.
मुंबईकरांची पिळवणूक थांबवा - संजय निरुपम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 06, 2018 5:38 AM