कामा रुग्णालयात काम बंद आंदोलन
By Admin | Published: December 3, 2014 02:26 AM2014-12-03T02:26:48+5:302014-12-03T02:26:48+5:30
गेल्या ४ वर्षांपासून कामा आणि आल्ब्लेस रुग्णालयाच्या परिचारिकांना वैद्यकीय अधीक्षक त्रास देत आहे.
मुंबई : गेल्या ४ वर्षांपासून कामा आणि आल्ब्लेस रुग्णालयाच्या परिचारिकांना वैद्यकीय अधीक्षक त्रास देत आहे. सोमवारी सायंकाळी वैद्यकीय अधीक्षक यांनी चोरीचा आळ कर्मचाऱ्यांवर घेतल्याने संतप्त झालेल्या परिचारिका आणि चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांनी मंगळवारी सकाळी साडेसातपासून काम बंद आंदोलन पुकारले होते. वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयाचे संचालक प्रमुख डॉ. प्रवीण शिनगारे यांच्याशी चर्चा केल्यानंतर दुपारी दीडच्या सुमारास काम बंद आंदोलन मागे घेण्यात आले.
कामा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजश्री कटके यांच्या वर्तनामुळे आम्हाला मानसिक त्रास होत असल्यामुळे यांची तत्काळ बदली करण्यात यावी, अशी मागणी परिचारिका आणि चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांकडून करण्यात आली
आहे. यासंदर्भात डॉ. शिनगारे यांना पत्र दिले आहे. ‘मी या प्रकरणात
लक्ष देईन. चौकशी करून योग्य तो निर्णय लवकरच घेईन,’ असे आश्वासन डॉ. शिनगारे यांनी दिल्यानंतर काम बंद आंदोलन
दुपारी दीडच्या सुमारास मागे घेण्यात आले. (प्रतिनिधी)