‘कामा’च्या परिचारिकांचे काम बंद आंदोलन स्थगित
By admin | Published: December 7, 2014 02:00 AM2014-12-07T02:00:13+5:302014-12-07T02:00:13+5:30
कामा रुग्णालयातील परिचारिकांनी सोमवार्पयत काम बंद आंदोलन स्थगित केले आहे.
Next
मुंबई : कामा रुग्णालयातील परिचारिकांनी सोमवार्पयत काम बंद आंदोलन स्थगित केले आहे. शनिवारी सकाळी वैद्यकीय शिक्षणमंत्री विनोद तावडे आणि वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयाचे संचालक डॉ. प्रवीण शिनगारे यांनी परिचारिकांना आंदोलन करू नका, तुमच्या मागण्यांवर चर्चा करून तोडगा काढला जाईल, असे सांगितले.
गेल्या 4 वर्षापासून वैद्यकीय अधीक्षक म्हणून डॉ. राजश्री कटके या कामा रुग्णालयात कार्यरत आहेत. वैद्यकीय अधीक्षकांची बदली करावी, अशी परिचारिकांची प्रमुख मागणी आहे. यांच्यामुळे परिचारिका, कर्मचारी, कामगार असा सर्वानाच त्रस होतो. परिचारिकांना मानसिक त्रस सहन करावा लागतो. 1 डिसेंबर रोजी वैद्यकीय अधीक्षकांनी कामगार आणि परिचारिकांवर चोरीचा आळ घेतल्याने अधिकच संतप्त झालेल्या परिचारिकांनी आंदोलन पुकारले होते.
डॉ. शिनगारे यांच्याशी चर्चा केल्यावर परिचारिकांनी 2 डिसेंबर रोजी आंदोलन मागे घेतले होते. पण आता 4 दिवस उलटूनही परिचारिकांना कोणत्याही प्रकारे सकारात्मक उत्तर न मिळाल्याने शनिवारी काम बंद आंदोलन पुकारण्याचा इशारा दिला होता. दुपारी 12 वाजल्यापासून परिचारिका आणि कामगार काम बंद आंदोलन करणार होते. मात्र, तुमच्या मागण्यांवर चर्चा करू, असे आश्वासन परिचारिकांना देण्यात आले. यामुळेच सोमवार्पयत आम्ही आंदोलन स्थगित केले आहे, असे परिचारिकांकडून सांगण्यात आले आहे. (प्रतिनिधी)