आयोजकांनो माघार घेणे थांबवा !
By admin | Published: August 23, 2015 04:04 AM2015-08-23T04:04:54+5:302015-08-23T04:04:54+5:30
दहीहंडीच्या धोरण निश्चितीवरून आधीच राजकारण सुरू असल्याने आयोजकांमध्येही अद्याप संभ्रमाचे वातावरण असताना गुरुवारी ठाण्याच्या ‘संघर्ष प्रतिष्ठान’च्या जितेंद्र आव्हाड
मुंबई : दहीहंडीच्या धोरण निश्चितीवरून आधीच राजकारण सुरू असल्याने आयोजकांमध्येही अद्याप संभ्रमाचे वातावरण असताना गुरुवारी ठाण्याच्या ‘संघर्ष प्रतिष्ठान’च्या जितेंद्र आव्हाड यांनी हंडीच रद्द केल्याने गोविंदा पथकांना मोठाच धक्का बसला आहे. त्यामुळे आयोजकांनी माघार घेणे थांबवावे, अशी हाक गोविंदा पथकांनी दिली आहे.
गोविंदा पथके आणि आयोजकांच्या गेल्या आठवड्यात झालेल्या बैठकीदरम्यान सरकारला २० आॅगस्टपर्यंत मुदत दिली होती. मात्र, गुरुवारी अचानक आव्हाड यांनी हंडी रद्द केल्याने गोविंदा पथकांचे डोळे विस्फारले आहेत. एका बाजूला दहीहंडी उत्सवाबाबत वाढणाऱ्या संभ्रमाविरोधात लढा सुरू असताना दुसऱ्या बाजूला सर्वात लोकप्रिय असणाऱ्या संघर्ष प्रतिष्ठानने उत्सवातून अचानक माघार घेणे वेदनादायी आहे. यामागे दुष्काळाचे कारण आव्हाड यांनी सांगितले असले तरी ही स्टंटबाजी आहे की राजकारण अशा चर्चांना सध्या गोविंदांच्या वर्तुळात उधाण आले आहे. त्यामुळे आता दहीहंडीच्या दिवशी ठाण्याकडे वळणारी गोविंदांची पावले थबकण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
संघर्ष प्रतिष्ठानच्या या निर्णयानंतर भाजपाचे आमदार राम कदमही उत्सव रद्द करण्याच्या विचारात आहेत. दुष्काळग्रस्तांना आर्थिक मदत करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. तर शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी गेल्या वर्षी अतिशय साधेपणाने उत्सव साजरा केला होता. त्यामुळे त्यांच्या भूमिकेकडे सध्या लक्ष लागले आहे.
‘दहीहंडी’ वाचविण्यासाठी स्वाक्षरी मोहीम!
दहीहंडी उत्सवाच्या धोरण अनिश्चितीमुळे पथक आणि आयोजकांचा संभ्रम शिगेला पोहोचला आहे. त्यात गेल्या आठवड्यात काही बड्या आयोजकांनी या उत्सवातून माघार घेतल्याने आता दहीहंडी बंद होणार का, असा सवाल उपस्थित झाला आहे.
याच प्रश्नाला वाचा फोडत उपनगरचा राजा म्हणून लोकप्रिय असणाऱ्या ‘जय जवान’ या गोविंदा पथकाने स्वाक्षरी मोहिमेद्वारे सणांना वाचवा अशी हाक दिली आहे.
जोगेश्वरी रेल्वे स्थानक पूर्वेला शनिवारी सायंकाळी या पथकातील गोविंदांनी स्वाक्षरी मोहीम घेतली. या मोहिमेला मुंबईकरांनी भरभरून प्रतिसाद दिला. ‘आता नाही तर कधीच नाही, दहीहंडी इतिहासजमा होऊ देऊ नका’ अशी साद ‘जय जवान’ पथकातील खेळाडूंनी मुंबईकरांना घातली.
या मोहिमेला मिळालेला प्रतिसाद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांना सादर करण्यात येणार आहे.
संघर्ष प्रतिष्ठानने अचानक उत्सव रद्द केल्याने आता गोविंदा पथकांना वाली कोण, असा प्रश्न निर्माण झाला आहे. जितेंद्र आव्हाड यांच्या या निर्णयाची कल्पनाच नसल्याने गोविंदा पथकांमध्ये काहीसे संभ्रमाचे वातावरण आहे. अशा प्रकारे उत्सव रद्द न करता दुष्काळग्रस्तांना मदत करूनही सुवर्णमध्य साधता येईल, असा प्रयत्न व्हायला पाहिजे. मात्र काहीही झाले तरी उत्सव दणक्यात साजरा करण्याचा आमचा मानस आहे. याविषयी आव्हाड यांच्याशी संवाद साधून त्यांचे मन वळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
- बाळा पडेलकर, दहीहंडी समन्वय समिती, अध्यक्ष
राज्य शासनाविरोधात लढा देण्यासाठी वेळोवेळी पाठिंबा दिलेल्या जितेंद्र आव्हाड यांनी अचानक उत्सव रद्द केल्याने काहीसे आश्चर्य वाटत आहे. त्यामुळे सगळे विघ्न आमच्याच उत्सवावर का, असा प्रश्न सतावत आहे.
- कमलेश भोईर, दहीहंडी समन्वय समिती, सचिव