Join us

जिभेचे लाड थांबवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 03, 2021 4:07 AM

मुंबई : अनेकदा पोटात जळजळ, वेदना आणि उलट्यांचा अनुभव येतो, ज्यास लोक खूप हलक्यात घेतात व दुर्लक्षित करतात; पण ...

मुंबई : अनेकदा पोटात जळजळ, वेदना आणि उलट्यांचा अनुभव येतो, ज्यास लोक खूप हलक्यात घेतात व दुर्लक्षित करतात; पण असे तर नाही ना की आपल्याला अल्सर आहे. होय, अल्सर ही एक प्रकारची जखम आहे, जी पोट किंवा आतड्यांच्या पृष्ठभागावर हळूहळू विकसित होते. त्यामुळे वेळीच जिभेचे लाड थांबवून आहार आणि जीवनशैलीकडे लक्ष देणे गरजेचे असल्याचे मत वैद्यकीय तज्ज्ञांनी मांडले आहे.

अल्सर म्हणजे एक प्रकारची जखम असते. सर्वसाधारणपणे या जखमा जठराला किंवा लहान आतड्याच्या सुरुवातीच्या भागात (ड्युओडेनम) होतात. आम्लपित्ताशी आपण ज्या अल्सरचा संबंध जोडतो तो हाच. याशिवाय काही रुग्णांमध्ये अन्ननलिका, मोठे आतडे किंवा लहान आतड्यालाही वेगवेगळ्या कारणांमुळे अल्सर होऊ शकतो. आपल्याकडे आम्लपित्ताच्या रुग्णांची संख्याही कमी नाही. त्यातील कित्येकांना वारंवार आम्लपित्ताचा त्रास होत असतो. या त्रासात देखील रुग्णांना पित्त उसळणे, मळमळ व उलटी होणे, पोट गच्च होणे अशी लक्षणे दिसू शकतात. दुर्बिणीतून तपासणी (एंडोस्कोपी) करून अल्सर आहे की नाही हे सांगता येते, अशी माहिती पोटविकारतज्ज्ञ डॉ. विकास बनसोडे यांनी दिली आहे.

अल्सरची लक्षणे

*पोटात वारंवार दुखणे

*आम्लपित्त होणे

*सतत पित्त वर येऊन छातीच्या मध्यभागी दुखणे

* भूक कमी होते, काही जणांचे वजनही कमी होते. बेंबीच्या वरच्या भागात दुखायला लागते.

*अल्सरच्या गंभीर लक्षणांमध्ये दुखणे वाढते, दुखण्यामुळे रात्रीतून उठून बसावे लागते. अशा दुखण्यात बऱ्याचदा खाल्ल्यावर आराम पडल्यासारखे वाटते. मळमळ आणि आम्लपित्त झाल्यानंतर होतात तशा उलट्याही होऊ शकतात. आजार आणखी पुढे गेला असेल तर उलटीतून रक्त पडू शकते. काही रुग्णांमध्ये शौचावाटे रक्त जाऊ शकते किंवा शौच काळ्या रंगाचे होऊ शकते.

काय काळजी घेणार

*वारंवार अति मसालेदार खाणे, धूम्रपान व मद्यपान टाळावे.

*रात्रीची जागरणे टाळलेलीच बरी.

*अनेकांना क्रोसिन, काँबिफ्लॅम किंवा इतर कुठल्याही वेदनाशामक गोळ्या गरज नसताना वापर टाळावा.

वैद्यकीय सल्ला महत्त्वाचा

आम्लपित्तावर स्वत:च्या मनानेच सारखी आम्लपित्तनाशक औषधे घेण्याची सवय कित्येकांना असते. यात उपचार तर अर्धवट होतातच; पण औषधाने आजाराचे निदान केले जात नाही. आम्लपित्ताच्या लक्षणांवर अँटासिड औषधे घेताना दुसरीकडे तिखट - मसालेदार खाणे, धूम्रपान किंवा मद्यपानाचे कुपथ्य देखील सुरूच राहण्याची शक्यता अधिक असते. परिणामी आम्लपित्तावर योग्य इलाज होतच नाही. त्यामुळे स्वत:च्या मनाने आम्लपित्तावर वरवरचे उपाय करत राहण्यापेक्षा डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

- डॉ. नीळकंठ रणदिवे, पोटविकारतज्ज्ञ