मुंबई: मुख्यमंत्री, विधानसभा अध्यक्षांनी आदेश दिल्यानंतरही मुंबादेवी मंदिराच्या दर्शनीभागातील बहुमजली वाहनतळाचे काम सुरूच असल्याबद्दल अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी विधानसभेत शुक्रवारी तीव्र नाराजी व्यक्त केली आणि हे बांधकाम तातडीने थांबविण्याचे निर्देश त्यांनी दिले.
या बहुमजली वाहनतळाचे बांधकाम पुढे रेटणाऱ्या पालिका अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, असे निर्देशही नार्वेकर यांनी दिले. भाजपचे अतुल भातखळकर यांनी माहितीच्या मुद्द्याद्वारे मुंबादेवी मंदिर परिसरातील बांधकामाचा विषय उपस्थित केला. त्यावर सभागृहात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. या बांधकामाविरोधात नार्वेकर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. उच्चस्तरावर निर्णय होत नाही, तोपर्यंत हे काम थांबवावे, असे निर्देश मुख्यमंत्री आणि विधानसभा अध्यक्षांनी दिलेले होते, असे असतानाही संबंधित अधिकाऱ्यांनी, महापालिकेच्या आयुक्तांनी काम सुरू ठेवले. ही गंभीर बाब आहे. हे निर्देश त्यांना कमी वाटत असतील, तर त्यांच्यावर त्वरित कारवाई करावी लागेल. कंत्राटदाराचा फायद्यासाठी पालिकेचे कर्मचारी काम करत असतील, तर त्यांच्यावर कारवाई अपेक्षित आहे, असे नार्वेकर म्हणाले.
तत्पूर्वी, हा मुद्दा उपस्थित करताना भातखळकर म्हणाले, मुंबादेवी मंदिर परिसरातील बहुमजली वाहनतळामुळे मुंबादेवी मंदिराचा दर्शनी भाग झाकला जाणार आहे. त्यामुळे भाविकांमध्ये तीव्र असंतोष आहे. त्याची दखल घेऊन मुख्यमंत्र्यांनी तेथे भेट देत तत्काळ काम थांबविण्याचे आदेश दिले. विधानसभेत याआधी हा विषय चर्चेला आला असता, अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी काम तत्काळ थांबविण्याचे आदेश दिले होते. मात्र, काम आजही सुरू आहे. कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांनी संगनमत करून सभागृहाचा अपमान सुरू केला आहे.