मुंबई : पदपथ अतिक्रमणमुक्त करण्यासाठी पालिकेने कारवाई सुरू केली आहे़ या अंतर्गत दादर येथील पदपथावर चबुतरे उभारून लावण्यात आलेले झेंडे पालिकेने खाली उतरविले़ यामुळे संतप्त शिवसैनिकांनी रानडे रोड परिसरात रास्ता रोको आंदोलन केले़ यामुळे या परिसरात प्रचंड वाहतूककोंडी झाली होती़ पालिका कारवाईवर ठाम असल्याने काही वेळाने शिवसेनेलाच या आंदोलनातून माघार घ्यावी लागली़ पदपथ नागरिकांकरिता खुले करण्यासाठी पालिकेने अशी कारवाई सुरू केली आहे़ त्यानुसार जी उत्तर विभाग कार्यालयाच्या पथकाने पदपथावर चबुतरा उभारून लावण्यात आलेले झेंडे काढून टाकण्यास सुरुवात केली़ या कारवाईत पालिकेने शिवसेना, भाजपा आणि मनसेचे पदपथावर फडकवलेले झेंडे काढून टाकण्यास सुरुवात केली़ या कारवाईमुळे शिवसेनेचे कार्यकर्ते संतापले. त्यांनी रानडे रोडवर मोठ्या संख्येने उतरून कार्यकर्त्यांनी रस्ता रोको आंदोलन केले़ त्यामुळे या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती़ वाहतूक बराच वेळ खोळंबल्यामुळे लोकांची प्रचंड गैरसोय झाली़ (प्रतिनिधी)
दादरमध्ये शिवसैनिकांचा रास्ता रोको
By admin | Published: July 03, 2015 1:48 AM