Join us

'पाकिस्तानी गायकांचं तुणतुणं वाजवणं बंद करा!', मनसेचा एफएम रेडिओ वाहिन्यांना इशारा 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2019 4:16 PM

Pulwama Terror Attack : पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर देशवासीयांमध्ये संतापाचे वातावरण पसरले आहे. या हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांना भारतात काम करू द्यायचे नाही, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

ठळक मुद्देरेडिओ चॅनलवर पाकिस्तानी गायक आणि संगीतकारांची गाणी वाजवू नका - मनसेपाकिस्तानी गाणी बंद करण्यासाठी ‘सर्जिकल स्ट्राइक’ कसा करायचा, हे मनसेला माहिती आहे - मनसे

मुंबई : पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर देशवासीयांमध्ये संतापाचे वातावरण पसरले आहे. या हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांना भारतात काम करू द्यायचे नाही, अशी मागणी जोर धरू लागली आहे. या पार्श्वभूमीवर, मनसेनं एफएम रेडिओ वाहिन्यांनादेखील इशारा दिला आहे. ''पाकिस्तानच्या आश्रयाने फोफावलेल्या जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने केलेल्या भ्याड हल्ल्यात सीआरपीएफचे 40 जवान शहीद झालेत. भारत-पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका कधी उडेल, काही सांगता येत नाही. अशा स्फोटक वातावरणात आपल्या रेडिओ वाहिन्या मात्र नुसरत फतेह अली खान, राहत फतेह अली खान, आतिफ अस्लम, अली झफर, सज्जाद अली, गुलाम अली, रेश्मा, सफाकत अमानत अली यांसारख्या पाकिस्तानी गायक-संगीतकारांची गाणी भारतीयांना ऐकवतायत. सिनेमा असो की यू ट्युब किंवा अगदी रेडिओ वाहिन्या, दरवेळी काय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेच पाकिस्तानी कलाकारांना विरोध करायचा? या रेडिओ वाहिन्यांमध्ये जे लोक काम करतात किंवा इथल्या कार्यक्रमांचं शेड्यूल जे आखतात, त्यांना देशवासीयांची भावना काय आहे, याची काहीच जाणीव नाही का ? मनसे जोपर्यंत विरोध करणार नाही तोपर्यंत पाकिस्तानचं तुणतुणं वाजतच राहणार का ?” अशा शब्दांत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सरचिटणीस आणि महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेनेच्या कार्याध्यक्षा शालिनी ठाकरे यांनी एफएम रेडिओ वाहिन्यांना रोखठोक इशारा दिला आहे.

एफएम रेडिओ वाहिन्यांना पाठवलेल्या पत्रात शालिनी ठाकरे यांनी म्हटलं आहे की, “शहीद जवानांच्या कुटुंबीयांच्या अश्रूंचा सूड घेण्यासाठी एक देश म्हणून आपण सर्व भारतीय वचनबद्ध असताना आपल्या लोकप्रिय रेडिओ वाहिनीवर मात्र अत्यंत निर्लज्जपणे पाकिस्तानी गायक -संगीतकारांची गाणी वाजवली जात आहेत. पाकिस्तान हे शत्रुराष्ट्र आपल्या देशाविरोधात सातत्याने दहशतवादी कारवाया करत असताना, भारत-पाक सीमेवर अत्यंत तणावाचं वातावरण असताना तसंच या दोन देशांमध्ये कधीही युद्धाचा भडका उडेल अशी नाजूक स्थिती असताना आपली रेडिओ वाहिनी मात्र नुसरत फतेह अली खान, राहत फतेह अली खान, आतिफ अस्लम, अली झफर, सज्जाद अली, गुलाम अली, रेश्मा, सफाकत अमानत अली यांसारख्या पाकिस्तानी गायक-संगीतकारांची गाणी करोडो भारतीयांना ऐकवत आहे.

 

संगीत ऐकणा-याच्या मनात प्रेमाची भावना निर्माण होते हे खरं असलं तरी सध्याच्या संवेदनशील स्थितीत पाकिस्तानी गायक-संगीतकारांची गाणी मात्र देशवासीयांच्या मनात संतापाची भावना निर्माण करत आहेत. म्हणूनच रेडिओ वाहिन्यांवर पाकिस्तानी गायक-संगीतकारांची गाणी वाजवली जाऊ नयेत, अशी प्रत्येक भारतीयाची इच्छा आहे.”

 

पाकिस्तानी गायक-संगीतकारांची गाणी आपल्या रेडिओ वाहिनीवर वाजवणं तत्काळ थांबवावं, अशी मागणी मनसेनं पत्राद्वारे केली आहे.  भारतीयांच्या भावनांचा आपण आदर कराल याची खात्री आहेच, अन्यथा आपल्या रेडिओ वाहिनीवरून वाजवली जाणारी पाकिस्तानी गाणी बंद करण्यासाठी ‘सर्जिकल स्ट्राइक’ कसा करायचा, हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला ठाऊक आहेच, असा इशाराही शालिनी ठाकरे यांनी दिला आहे. 

टॅग्स :पुलवामा दहशतवादी हल्लाभारतीय जवानदहशतवाद