भारतीय रेल्वेचे खासगीकरण थांबवा - वेस्टर्न रेल्वे मजदूर संघ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2020 11:29 PM2020-01-10T23:29:15+5:302020-01-10T23:29:17+5:30
देशातील दुसरी तेजस एक्स्प्रेस खासगी तत्त्वावर चालविण्यात येणार आहे.
मुंबई : देशातील दुसरी तेजस एक्स्प्रेस खासगी तत्त्वावर चालविण्यात येणार आहे. त्यामुळे देशात रेल्वेचे खासगीकरण होणार नाही, असे म्हणणाऱ्या रेल्वेमंत्र्यांचे याकडे लक्ष नाही का, असा सवाल वेस्टर्न रेल्वे मजदूर संघाच्या वतीने शुक्रवारी मुंबई सेंट्रल येथे केलेल्या आंदोलनातून विचारण्यात आला. रेल्वे कॉलनीची विक्री थांबवा, खासगीकरण होऊ देणार नाही, भारतीय रेल्वेची विक्री थांबवा, रेल्वे वाढेल तरच देश वाढेल, अशी भूमिका वेस्टर्न रेल्वे मजदूर संघाच्या कर्मचाऱ्यांनी मांडली. सफाई कामगार, उद्घोषणा करणारे, गँगमन यांची भरती कंत्राटी पद्धतीने केली जात आहे. यासह इतर अनेक पदेही कंत्राटी पद्धतीने भरली जात आहेत. त्यामुळे कामगारांना त्यांच्या हक्कापासून वंचित करण्याचा डाव रचला जात आहे. यासह खासगीकरण झाल्यास प्रवाशांना मिळणाºया सवलती मिळणार नाहीत. खासगी एक्स्प्रेसचे तिकीट दर अवाजवी असेल. १७ जानेवारी रोजी दुसरी खासगी तेजस एक्स्प्रेस चालविण्यात येणार आहे. याविरोधात कर्मचारी संघटना आंदोलन करेल, असे वेस्टर्न रेल्वे मजदूर संघाचे मुंबई मंडळाचे अध्यक्ष किरण पाटील यांनी सांगितले.