मुंबई : प्लॅस्टिकबंदीनंतर विविध अडचणींमुळे छोटे व्यावसायिक आणि ग्राहकांमधून संताप होऊ लागल्यानंतर, गुरुवारी किराणा दुकानांमधील पाव किलोहून अधिक वजनासाठी पॅकिंगच्या पिशव्यांवरील बंदी शिथिल करण्याची घोषणा शासनाने केली. व्यापारी वर्गामधून पॅकिंगवरील बंदी उठविल्याच्या निर्णयाचे स्वागत होत असून, बंदी असलेल्या पिशव्यांचे उत्पादन बंद करण्याची मागणीही जोर धरू लागली आहे.प्लॅस्टिकबंदीचा निर्णय शिथिल करण्याबाबत ‘लोकमत’ने किरकोळ व्यापाºयांची मते जाणून घेतली आहेत. दुकानात उपलब्ध असलेल्या प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर द्रव पदार्थ, मसाला आणि साखर अशा वस्तूंच्या पॅकिंगसाठी केला जाईल. प्लॅस्टिकबंदी अंमलात आणताना प्लॅस्टिक उत्पादकापासून बंदी आणणे आवश्यक आहे. मुळासकट प्लॅस्टिकबंदी झाल्यास, प्लॅस्टिकबंदीचा निर्णय यशस्वी होईल, असे काही व्यापाºयांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.मसाला, साखर, तांदूळ, तेल यांसारख्या वस्तूंच्या विक्रीसाठी रिटेल पॅकिंगवरची बंदी उठविण्यात आली आहे. प्लॅस्टिक पिशवी वापरण्यावरील बंदी मात्र तशीच लागू असल्याचे राज्य सरकारने स्पष्ट केले आहे. किराणा दुकानदारांना पॅकेजिंगसाठी ५० मायक्रॉनहून अधिक जाडीच्या प्लॅस्टिक वापराची मुभा देण्यात आली आहे.घराघरांतून गोळा करणार प्लॅस्टिकराज्य सरकारने गेल्या शनिवारपासून राज्यात प्लॅस्टिक बंदी सुरू केली आहे. मात्र, नागरिकांचे या बंदीला एक सामाजिक बांधिलकी म्हणून सहकार्य मिळण्यासाठी एक खारीचा वाटा म्हणून जोगेश्वरी (पूर्व) येथील बांद्रेकरवाडी मित्रमंडळाने पुढाकार घेतला आहे.मंडळाने प्लॅस्टिक बंदी पूर्णत्वास नेण्याकरिता रविवार, १ जुलै रोजी येथील बांद्रेकरवाडीतील प्रत्येक घर प्लॅस्टिक मुक्त करण्याच्या उद्देशाने मंडळाचे २५ ते ३० कार्यकर्ते सकाळी ९ ते दुपारी २ वाजेपर्यंत येथील रहिवाशांच्या घरोघरी भेटीला जाणार आहेत.त्यांच्या घरातील जितक्या प्लास्टिक पिशव्या, प्लॅस्टिक बाटल्या, थर्माकोल, प्लॅस्टिक प्लेट या वस्तू जमा करून या मंडळकडे सुपूर्द करणार आहेत. या बदल्यात ते रहिवाशांना एका घरासाठी एक मोफत कापडी पिशवी देणार आहेत. मंडळाने खास ५ किलोच्या सुमारे ५ हजार कापडी पिशव्या तयार केल्या आहेत. जमा झालेले प्लॅस्टिक महानगरपालिकेच्या यंत्रणांकडे सुपूर्द करण्यात आहे. जेणेकरून महापालिका त्याची योग्य विल्हेवाट लावेल, असे मंडळाचे कार्यकर्ते गणेश हिरवे यांनी सांगितले.सध्यातरी बहुतांश ग्राहक घरूनच कापडी, कागदी आणि भांडे घेऊन येत खरेदी-विक्री सुरू आहे. कार्यालयातून सरळ दुकानात येणाºया ग्राहकांना तेल, तूप यासारखे पदार्थ घेण्यास अडचण होत आहे. प्लॅस्टिकबंदीच्या निर्णयामध्ये शिथिलता आणल्यामुळे प्लॅस्टिक वापरण्यास पुन्हा सुरुवात होण्याची शक्यता आहे.- शिवजी पटेल, किरकोळ किराणा व्यापारी.धान्य, कडधान्य, तेल या पदार्थांची विक्री करताना, अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते. निर्णयातील शिथिलतेमुळे अडचणी दूर होणार आहेत. पिशव्यांवरील बंदी कायम असल्याने, पर्याय म्हणून वापरण्यात येणाºया कागदी पिशव्या पावसात भिजल्याने ग्राहकांचा रोष सहन करावा लागत आहे.- प्रेमजी पटेल, किरकोळ किराणा व्यापारी.पॅकिंगसाठी प्लॅस्टिक वापरू दिल्याने, सर्वसामान्य आणि व्यापाºयांचा फायदा होणार आहे. प्लॅस्टिक पिशव्यांमुळे मुंबई तुंबण्याची समस्या उद्भवत होती. त्यामुळे प्लॅस्टिकबंदीच्या निर्णयाचे स्वागत आहे.- संदीप वानखडे, किरकोळ, किराणा व्यापारी.
प्लॅस्टिक पिशव्यांचे उत्पादनच बंद करा! व्यापाऱ्यांच्या प्रतिक्रिया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 01, 2018 3:47 AM