रॅगिंगला वेळीच रोखा; शिक्षक व पालक यांच्यात संवाद वाढविण्याची नितांत गरज
By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2019 01:45 AM2019-06-04T01:45:13+5:302019-06-04T06:26:16+5:30
रॅगिंगसारख्या विकृती पुन: पुन्हा समोर येतात. या प्रकाराला आळा घालण्यासाठी शैक्षणिक संस्था, शिक्षक व पालक यांच्यात संवाद वाढविण्याची नितांत गरज आहे.
नायर वैद्यकीय महाविद्यालयात डॉ. पायल तडवी हिचा रॅगिंगमुळे बळी गेल्यानंतर देशभरात पुन्हा एकदा हा विषय चर्चेत आला आहे. राज्यातील शेकडो ठिकाणी विविध प्रकारे रॅगिंगच्या घटना घडत असतात. अशी घटना उजेडात आली की, त्यावर ठरल्याप्रमाणे हळहळ व्यक्त करायचे सोपस्कार करून आपण थांबतो. यामुळे रॅगिंगसारख्या विकृती पुन: पुन्हा समोर येतात. या प्रकाराला आळा घालण्यासाठी शैक्षणिक संस्था, शिक्षक व पालक यांच्यात संवाद वाढविण्याची नितांत गरज आहे.
एखादी घटना घडली की, खूप मोठ्या प्रमाणात हळहळ व्यक्त करायची आणि नंतर आपल्या सोयीनुसार तो विषय सोडून द्यायचा अशी एक मानसिकता आपल्या समाजात वेगाने विकसित होताना दिसत आहे. यामुळे घटना, तिची पार्श्वभूमी आणि त्यामुळे भावी समाजावर होणारे त्याचे परिणाम याकडे दुर्लक्ष होते. त्या-त्या काळात समाजाचा रेटा वाढला की, सरकारकडूनही अशा घटना रोखण्यासाठी कायदे, नियम, नियमावली तयार केल्या जातात; परंतु पुढे काय होते, याचा पाठपुरावा करण्याची तसदी कोणी घेत नाही. समाजाची अशी मानसिकता आपल्या देशात शाळा, महाविद्यालय, वसतिगृहांमध्ये होणाऱ्या रॅगिंगसंदर्भात पाहावयास मिळते.
अनेक शैक्षणिक संस्था स्वत:ची प्रतिष्ठा राखण्यासाठी रॅगिंग किंवा तत्सम घटना उजेडात आणत नाहीत. त्यांच्या या कृतीमुळे गैरप्रकारांना आळा बसण्याऐवजी बळच मिळते, याचा विचार होताना दिसत नाही. कारण अर्थकारण व राजकारण आडवे येते. शैक्षणिक संस्थांनीच जर धाडस दाखविले तर त्यांचा चांगला परिणाम दिसून येईल. रॅगिंगविषयी कायदे असले तरी त्याची अंमजबजावणी किती होते हा औत्सुक्याचा विषय आहे. कुठल्याच शाळेत किंवा महाविद्यालयात रॅगिंग केली तर ही शिक्षा होऊ शकते, असा फलक लावलेला दिसत नाही. तसेच विद्यार्थ्यांना तक्रार करण्यासाठी तक्रारपेटीही गायब झाली आहे. यामुळे शैक्षणिक संस्थांमध्ये गुन्हेगारी प्रवृत्ती बळावू लागली आहे.
अॅडमिशन व इतर फीच्या नावाखाली पैसे उकळणाºया संस्था अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे सरकारने रॅगिंगविरोधात शैक्षणिक संस्थांविरोधात पावले उचलायला हवीत. रॅगिंगचे प्रकार घडल्यास त्या शिक्षण संस्थेची मान्यता रद्द करायला हवी. शाळा व्यवस्थापनाला जबाबदार धरून त्यांच्यावर कारवाई करायला हवी. अनुदान बंद करायला हवे, अशी ठोस पावले उचलली तर नक्कीच रॅगिंगला आळा बसू शकेल.
पालक व शिक्षण संस्थांमधील संवाद हरवला आहे. आपल्या पाल्याच्या जडणघडणीला लागणाºया सर्व गोष्टींची पूर्तता केली जात नाही. शाळा, महाविद्यालयांत थोडीफार रॅगिंग होते हे पालक आपल्या पाल्याला समजावून सांगतात. थोडं सहन कर आणि दुर्लक्ष कर, असे सांगून पालक मोकळे होतात. मात्र एखाद्याने एकदा सहन केले तर तो गिºहाईकच बनतो. यामुळे टवाळखोरांना थोडे धाडसाने तोंड दिले आणि पालकांनी पाठिंबा दिला तर, त्या विद्यार्थ्यांना मानसिक आधार मिळतो. यामुळे अशा घटना टाळण्यासाठी पालकांनी आपल्या पाल्याला पूर्ण समजून घेणे गरजेचे आहे. तसेच शिक्षक व त्या शिक्षण संस्थेशी संवाद वाढविणे गरजेचे आहे. शिक्षकांनी संवेदनशीलपणे प्रत्येक गोष्टीवर लक्ष ठेवले आणि योग्यवेळी गैरप्रकार निदर्शनास आणून दिले, तर अशा घटनांना आळा बसू शकेल, अशी माहिती मानसोपचारतज्ज्ञ डॉ. रुस्तम शाह यांनी दिली.
महाविद्यालयातून चालणारा रॅगिंग हा प्रकार अत्यंत अयोग्य आहे. यातून अनेकदा विद्यार्थी आत्महत्येसारखा टोकाचा विचार करतात. शैक्षणिक संस्थेतील रॅगिंग हा ज्याप्रमाणे दखलपात्र गुन्हा मानण्यात आला आहे. त्याचप्रमाणे, या संस्थांमध्ये जातिभेदावर रॅगिंग करणाºया आरोपीस कडक शिक्षेची तरतूद कायद्यात करण्यात यावी, असे मला वाटते. - शुभम वायंगणकर, मॉडेल कॉलेज.
महाविद्यालयातून होणारे रॅगिंग अयोग्यच आहे. त्यामुळे विद्यार्थी मानसिक तणावाखाली येतात, त्यांच्यात नैराश्य येते. त्याचा अभ्यासावर परिणाम होतो. विद्यार्थ्यांमधील नातेसंबंध खराब होतात, वाद होतात. रॅगिंगला आळा घालण्यासाठी महाविद्यालयांनी पुढाकार घेण्याची गरज आहे. - नेहल थोरावडे, एमए, टाटा सामाजिक विज्ञान संस्था, मुंबई.
परिस्थिती नसतानाही खूप कष्ट आणि मेहनतीने महाविद्यालयात प्रवेश घेणारी मुले, स्व:त बरोबरच आपल्या पालकांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी धडपड करतात. रॅगिंगसारख्या जीवघेणा प्रकाराला सामोरे जावे लागणार, याची पुसटशी कल्पनाही या मुलांना नसते. रॅगिंग म्हटलं की, मजा-मस्ती त्यात येते. एका मर्यादेपर्यंत या गोष्टी ठीक असल्या, तरी समोरच्याला जास्त त्रास होणार नाही, याची काळजी घ्यावा. या प्रकाराला आळा घातला गेला तर उत्तमच. - मृण्मयी वैद्य, साठ्ये महाविद्यालय.
खरं तर रॅगिंग हा प्रकार मुलांच्या मन आणि बुद्धित न्यूनगंड निर्माण करण्यासाठीच केला जातो. काही क्षणांच्या आनंदासाठी समोरच्या व्यक्तीला शारीरिक व मानसिक छळाला सामोरे जावे लागते. मानसिक छळ तर अत्यंत गंभीररीत्या व्यक्तीला इजा पोहोचवितात. समोरच्याची इच्छाशक्ती संपते. वर्ण, जात, गोत्र, धर्म अशा अनेक गोष्टींवरून त्यांच्यावर शेलक्या शब्दांत टीका केली जाते. त्यामुळे रॅगिंग ही वाईटच आहे, पण आजही त्याचा सर्रास वापर केला जातोय, हे दु:खद आहे. - हर्षद बोले, सिद्धार्थ कॉलेज
रॅगिंगमुळे शांत, सहनशील, बाह्य जगाची ओळख नसणाºया मुलांवर मानसिक व शारीरिकदृष्ट्या परिणाम होतात. ते मनातून खचून जातात. मित्रमैत्रिणींबरोबर राहण्यापेक्षा त्यांना एकटेपणा हवाहवासा वाटतो. यामुळे ते कधी-कधी नशेच्या आहारीदेखील जाण्यास प्रवृत्त होतात. आजच्या काळात मोबाइलमुळे इंटरनेट आणि सोशल मीडियावरून रॅगिंग करण्याचे प्रमाण वाढले आहेत. बºयाच वेळा बळी पडणाºया व्यक्तीचे छायाचित्र आणि व्हिडीओज् हे खासगी ग्रुपवरून पाठविले जातात आणि त्याला मानसिक त्रास देण्याचा प्रयत्न केला जातो. - प्रज्ञा निकम, रुईया महाविद्यालय.
रॅगिंग याचा अर्थ असा की, ज्यामुळे कोणत्याही शैक्षणिक संस्थेतील विद्यार्थ्यास शारीरिक किंवा मानसिक हानी पोहोचत असेल किंवा पोहोचण्याची शक्यता असेल किंवा त्याच्यात धास्तीची किंवा भयाची अथवा लज्जेची किंवा अडचणीत आल्याची भावना निर्माण होत असेल, असे गैरवर्तणुकीचे प्रदर्शन करणे किंवा असे कोणतेही कृत्य करणे, असा आहे. - परवीन तडवी, डोंबिवली
कॉलेजमध्ये प्रथमच प्रवेश करणाºया ज्युनियर विद्यार्थ्याला आपल्याच कॉलेजातील सीनियर्सच्या छळाला सामोरे जावे लागते. हा भाग सीनियर्ससाठी जरी मजा, मस्ती, मस्करीचा असला, तरी ज्या विद्यार्थ्यांसोबत रॅगिंग होते, त्यासाठी हे फारच अपमानास्पद आणि लज्जास्पद आहे. खरं तर या सर्व घटनेमागे शिक्षकही तेवढेच जबाबदार असतात, असे माझे मत आहे. विद्यार्थ्यांनी केलेल्या तक्रारींवर खूप मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष केले जाते. त्यामुळे जे रॅगिंग करतात, त्यांना अधिक बळ मिळतं. त्यासाठी विद्यार्थ्यांनी सर्वात आधी वर्गशिक्षकांकडे यांची तक्रार करावी. जर त्यांनी दुर्लक्ष केले, तर सरळ पोलिसात तक्रार करावी. - स्नेहल सोहनी, सिद्धार्थ महाविद्यालय.
रॅगिंग हा प्रकार मला स्वत:ला तरी आवडत नाही. काही जण त्याचं समर्थन करतात. त्यांचं म्हणणं असतं की, थोडीफार मस्ती चालते. माझाही त्याला आक्षेप नाही, पण बºयाचदा मस्ती ही त्रासामध्ये बदलते. मुलं तारु ण्याच्या जोशात मर्यादा ओलांडतात. - रोहन शास्त्री, नोकरी
रॅगिंगसारखी कुप्रथा आजही कायद्याला न जुमानता शिक्षण क्षेत्रात दिसून येते. उच्चशिक्षण घेण्यासाठी प्रसंगी आपल्या घरापासून दूर राहणारे अनेक विद्यार्थी आहेत. रॅगिंगमुळे त्यांचे मानसिक खच्चीकरण होते, नैराश्य येते. त्यातूनच असे प्रसंग घडतात. सरकारने अत्यंत कडक पावले उचलण्याची आवश्यकता आहे. कायद्याची अधिक प्रभावीपणे अंमलबजावणी होण्याची गरज आहे. त्याबद्दल शिक्षण क्षेत्रात सतत अवेअरनेस होणे गरजेचे आहे. त्यामुळे भविष्यात असे प्रसंग घडणार नाहीत. - विश्वास उदगीरकर, नोकरी