मुंबई- शहराची ‘लाईफ लाईन’ असलेल्या मुंबई लोकलसह एसटी वाहतूक बंद झाल्याने शहरातील वाहतूकीचा वेग मंदावला होता. मध्य रेल्वेच्या भांडूप, दादर, घाटकोपर, शीव आणि पश्चिम रेल्वेच्या अंधेरी स्थानकात आंदोलनकर्त्यांकडून रेल रोको करण्यात आला. तथापि ‘भारत बंद’मुळे रस्त्यांवर वाहने कमी असल्याने वाहतूक कोंडीतून काहीअंशी दिलासा मिळाल्याची भावना मुंबईकरांनी समाजमाध्यमांवर व्यक्त केली.पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीच्या निषेधार्थ भारत बंदची हाक देण्यात आली. यानूसार सोमवारी ९ वाजल्यानंतर याचे पडसाद उमटण्यास सुरुवात झाली. अंधेरी-बोरीवली लोकल अंधेरी स्थानकात फलाट क्रमांक तीनवर येताच आंदोलनकर्त्यांनी लोकल अडवली. यावेळी १०० पेक्षा जास्त आंदोलनकर्ते रेल्वे रुळावर उतरले होते.स्थानकातील रेल्वे पोलिसांसह रेल्वे सुरक्षा बल आणि महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या जवानांनी तातडीने आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेत रेल्वे रुळ वाहतूकीसाठी खुला केला. मध्य रेल्वेच्या भांडूप, घाटकोपर, शीव स्थानकांवर सुमारे १० ते १५ जणांच्या समुहाने येत रेल रोको केला.गोवंडी स्थानकात रेल रोको करण्याच्या प्रयत्नात असलेल्या आंदोलनकर्त्यांना स्थानकात प्रवेश करण्याआधीच ताब्यात घेतल्याची माहिती पश्चिम परिमंडळाचे रेल्वे पोलीस उपायुक्त आणि मध्य परिमंडळाचे उपायुक्त (अतिरिक्त भार) पुरुषोत्तम कराड यांनी दिली. रेल रोकोच्या घटना वगळता सोमवारी दिवसभर तिन्ही मार्गावरील लोकल फेऱ्या सुरळित असल्याचा दावा रेल्वे प्रशासनाने केला आहे.मुंबईकरांना भारत बंदमुळे रस्त्यांवर वाहतूक कोंडीतून काहीअंशी सुटका मिळाली. जुहू ते अंधेरी हा प्रवास करताना नेहमीपेक्षा अर्धा तासाची बचत झाल्याचे टिष्ट्वट नमित शर्मा या नागरिकाने केले. तर भारत बंदमुळे शहरातील रस्त्यांवर वाहने कमी असल्याने काही मिनिटांत शहरात कुठेही पोहचणे शक्य झाल्याचे प्रिया दलाल या तरुणीने टिष्ट्वट केले.
पाच रेल्वे स्थानकांत रेल रोको!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2018 1:52 AM