मुंबई : मुंबई-गोवा महामार्गाच्या दुरावस्थेबाबत सरकार आणि प्रशासनाला जागे करण्यासाठी काँग्रेसच्यावतीने सोमवार, २७ नोव्हेंबर रोजी ‘रास्ता रोको सत्याग्रह’ आंदोलन करण्यात येणार आहे. महामार्गावर पनवेल आणि सावंतवाडी दरम्यान ठिकठिकाणी रास्ता रोको करण्यात येणार आहे.मुंबई-गोवा महामार्गावरील अपघातांमध्ये दरवर्षी एक हजार प्रवासी मृत्युमुखी पडतात. एका पाहणी अहवालानुसार महामार्गावर तब्बल ५५ ठिकाणी धोकादायक खड्डे आहेत. सरकारकडून खड्डे बुजविण्याचे नाटक केले जाते. खड्डे बुजवण्यातच शासनाचे करोडो रूपये लाटले जातात. मात्र, तंत्रशुद्ध पद्धतीने महामार्गाची दुरुस्ती केली जात नाही. या महामार्गावरील पनवेल ते इंदापूर या पहिल्या टप्प्याचे काम अद्याप अर्धवट आहे.तर, पुढील टप्प्यातील कामासाठी जमीन अधिग्रहणाचे काम नियमानुसार पार पाडले जात नाही. संपादित जमीन, घरे आणि दुकाने यासाठी समान न्यायाने मोबदला दिला जात नाही. या सर्व मुद्यांवर सरकारला जागे करण्यासाठी पक्षाच्यावतीने रास्ता रोको करणार असल्याचे प्रदेश काँग्रेसच्या प्रसिद्धीपत्रकात नमूद केले आहे.
मुंबई-गोवा महामार्गासाठी रास्ता रोको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2017 6:04 AM