बसस्थानकावर ताटकळत बसणे थांबणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2021 04:05 AM2021-07-08T04:05:58+5:302021-07-08T04:05:58+5:30

मुंबई : एसटी नेमकी कुठे पोहोचली, कुठे थांबली आहे, याची त्याचक्षणी माहिती मिळावी यासाठी एसटी महामंडळाने सर्व बसमध्ये ...

Stop sitting at the bus stand | बसस्थानकावर ताटकळत बसणे थांबणार

बसस्थानकावर ताटकळत बसणे थांबणार

Next

मुंबई : एसटी नेमकी कुठे पोहोचली, कुठे थांबली आहे, याची त्याचक्षणी माहिती मिळावी यासाठी एसटी महामंडळाने सर्व बसमध्ये ‘व्हीटीएस’ यंत्रणा बसविण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार मुंबई विभागातील ३४९ गाड्यांवर ही यंत्रणा बसविण्यात आली आहे. पाच आगारांतील बसस्थानकातून डिस्प्ले बोर्ड बसविण्यात आले असून लवकरच कार्यान्वित होणार आहेत. जेणेकरून प्रवाशांना एसटीचा नेमका ठावठिकाणा उपलब्ध होणार आहे.

रेल्वेच्या धर्तीवर राज्य परिवहन महामंडळ प्रवाशांच्या सोयीसाठी ‘व्हीटीएस’ यंत्रणा कार्यान्वित करत आहे. ही यंत्रणा बसविल्यानंतर प्रवाशांना संबंधित एसटी कोणत्या भागातून धावत आहे. तिचे शेवटचे लोकेशन काय होते. संबंधित बसस्थानकावर येण्यास किती वेळ लागणार आहे, तसेच सुटण्याची आणि पोहोचण्याची वेळ प्रवाशांना समजण्यास मदत होणार आहे.

असा होणार यंत्रणेचा लाभ

- एसटी बसस्थानकात उशिरा येण्यामागची कारणे अनेक असतात, त्याचा परिणाम अन्य बस फेऱ्यांवर होत असतो.

- एसटीचे वेळापत्रक सुधारावे व बसची सद्य:स्थिती प्रवाशांना कळावी यासाठी ‘व्हीटीएस’प्रणाली महत्त्वपूर्ण ठरणार आहे

- अपघात झाल्यास तत्काळ अपघातस्थळी मदत पोहोचविता यावी यासाठीही या यंत्रणेचा लाभ होणार आहे.

बसस्थानकात लागले मोठे स्क्रीन

- विभागातील पाच आगारांतील बसस्थानकातून डिस्प्ले बोर्ड लावण्यात आले आहेत.

- डिस्प्लेच्या माध्यमातून कुठली बस कुठल्या मार्गावर धावत असून ती किती वेळेत बसस्थानकात येणार आहे याची माहिती मिळणे सुलभ होणार आहे.

- बस सुटण्याची व पोहोचण्याची वेळ निश्चित असते. ती वेळ प्रवाशांना डिस्प्लेच्या माध्यमातून समजणार आहे.

- बसचा अपघात झाला तर त्याचीही माहिती ‘व्हीटीएस’मुळे तातडीने कळणार असल्याने आवश्यक ती मदत अपघातस्थळी पोहोचविणे शक्य होणार आहे.

- एखाद्या नियोजित किंवा अधिकृत थांब्यावर बस न थांबल्यास त्याची माहिती महामंडळाला कळणार असून त्यामुळे संबंधित चालक किंवा वाहकावर कारवाई करणे शक्य होणार आहे.

- बस सध्या कुठल्या मार्गावर धावत आहे, तेथून बसस्थानकात यायला किती अवधी आहे; मात्र उशीर झाला तर याची माहिती प्रवाशांना मिळणार असून चालक वेळकाढूपणा करीत असेल तर कारवाई करता येणार आहे.

कोट-

एसटीची वाट पाहत असलेल्या प्रवाशांना एस.टी.नेमकी कुठे आहे, याची माहिती कळावी, यासाठी राज्य परिवहन महामंडळातर्फे ‘व्हीटीएस’ यंत्रणा बसविण्यात आली आहे. प्रत्येक स्थानकात याबाबत डिस्प्ले बोर्ड बसविण्यात आले असून तांत्रिक बाबींची पूर्तता सुरू असून लवकरच कार्यान्वित केले जाणार आहेत.

वरिष्ठ अधिकारी, एसटी महामंडळ

Web Title: Stop sitting at the bus stand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.