माजी आरोग्यमंत्री
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : पश्चिम उपनगरातील एच पश्चिम, के पूर्व, पी उत्तर, आर मध्य येथे कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. रुग्णांना बेड्स, ऑक्सिजन कमी पडत आहेत. म्युटेशन आल्यामुळे स्पाईक प्रोटिन्समध्ये डबल म्युटेशन होऊन कोरोना संसर्गाची क्षमता खूप वाढली आहे.
फेरीवाल्यांनी रस्त्यांवर कब्जा केला असून त्यांच्या संख्येत ३० टक्के वाढ झाल्याचे चित्र आहे. कोरोना वाढण्याचे मूळ कारण म्हणजे रस्त्यावरची गर्दी, फूल मंडई, भाजी मंडईत नागरिकांची उसळलेली गर्दी यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून रस्त्यावरच्या फेरीवाल्यांना रोखणे गरजेचे आहे, असे मत राज्याचे माजी आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत यांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केले.
टेम्पो व गाडीतून भाजीपाला विकणे बंद करावे.
भाजी विक्रेते, फळ विक्रेते, फूल विक्रेते यांच्यावर नियंत्रण आवश्यक आहे, अन्यथा कोरोनाला राेखणे कठीण असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
शॉपिंग मॉलमध्ये मागच्या दाराने प्रवेश देऊन बिनधास्तपणे ग्राहक फिरताना आढळत आहेत. अगदी पश्चिम उपनगरातील शॉपिंग लेन म्हणून काही गल्ल्या प्रसिद्ध आहेत. तेथे लॉकडाऊन पाळला जात नसून सर्व व्यवहार सुरळीत सुरू आहेत. त्यामुळे प्रामाणिकपणे दुकान बंद ठेवणारे नाराज होताना दिसतात, तर फेरीवाले, भाजीविक्रेते यांच्याकडे परवाना असल्याने त्यांना ठरावीक वेळेत रस्त्यावर बसण्यासाठी नियमावली राज्यभर करण्याची गरज असल्याचे मत डॉ. दीपक सावंत यांनी व्यक्त केले.
-------------------------