ठाणे - राष्ट्रवादी काँग्रेसकडून 3 ऑक्टोबर रोजी कळवा रेल्वे स्थानकात रेल रोको केला जाणार आहे. एल्फिन्स्टनमध्ये जी घटना घडली तशी घटना भविष्यात घटना घडू नये आणि बुलेट ट्रेन ऐवजी लोकलने प्रवास करणाऱ्यांच्या समस्या सोडविण्याला प्राधान्यक्रम द्यावा, यासह इतर मागण्यांसाठी राष्ट्रवादी आता रेल्वे रोखरणार आहे. येत्या 3 ऑक्टोबर रोजी कळवा रेल्वे स्थानकात हे रेल रोको आंदोलन केले जाणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे.
शुक्रवारी सकाळी ऐन गर्दीच्या वेळेस एल्फिन्स्टन रेल्वे स्टेशनच्या पादचारी पुलावर झालेल्या चेंगराचेंगरीत 23 जणांचा मृत्यू झाला तर 39 जण जखमी झाले आहेत. त्यानंतर आता एकूणच रेल्वेच्या पादचारी पुलांच्या समस्यांकडे सर्वाच्याच नजरा वळल्या आहेत. बुलेट ट्रेनचे स्वप्न दाखविण्याऐवजी आणि ज्या ट्रेनचा मुंबईकरांना फायदाच नाही, अशी ट्रेन बंद करावी अशी मागणी आव्हाडांनी केली आहे. याशिवाय सर्वसामान्यांच्या लोकलच्या संख्येत वाढ करावी, वेळेची नियमितता पाळावी, आज ठाणे स्थानकातून तब्बल साडे सहा लाख प्रवासी रेल्वे रोज प्रवास करीत आहेत. परंतु येथील पादचारी पुलासह, इतर ठिकाणच्या रेल्वेच्या पादचारी पुलांची अवस्थाही गंभीर असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे या पुलांची संख्या वाढवावी, अरुंद पुल रुंद करावेत, सबर्बनसाठी 45 हजार कोटींचा निधी द्यावा, दिव्याला जंक्शनचा दर्जा द्यावा, कळव्यातून लोकल सुटाव्यात, पारसीक जंक्शन करावे, प्लॅटफॉर्म वाढवावेत आदींसह इतर मागण्यांसाठी येत्या 3 ऑक्टोबर रोजी हा रेल रोको केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
3 ऑक्टोबर रोजी सकाळी 8.30 वाजता म्हणजेच ऐन गर्दीच्या वेळेस हा रेल रोको केला जाणार असल्याने त्याचा परिणामदेखील कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांना बसणार आहे. यापूर्वी देखील राष्ट्रवादीच्या वतीने अशाच पध्दतीने रेल रोको केला होता. त्यानंतर आता भविष्यात अशा प्रकारच्या दुर्देवी घटना घडू नयेत यासाठी हे रेल रोको केले जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.