Join us

परीक्षा काळातच शिक्षकांना देण्यात येणारं प्रशिक्षण स्थगित करावे, शिक्षक परिषदेची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2018 3:53 PM

आजपासून १२ वीच्या परीक्षा सुरू झाल्या आहेत तर १० वीच्या तोंडी, प्रॅक्टिकल व श्रेणी विषयांचे मूल्यमापनाचे नियोजन शाळांमध्ये सुरू असतानाच प्रादेशिक विद्या प्राधिकरणाने मुंबईतील शिक्षकांना २३ व २४ फेब्रुवारी रोजी प्रशिक्षणाचे आयोजन केले आहे.

मुंबई- आजपासून १२ वीच्या परीक्षा सुरू झाल्या आहेत तर १० वीच्या तोंडी, प्रॅक्टिकल व श्रेणी विषयांचे मूल्यमापनाचे नियोजन शाळांमध्ये सुरू असतानाच प्रादेशिक विद्या प्राधिकरणाने मुंबईतील शिक्षकांना २३ व २४ फेब्रुवारी रोजी प्रशिक्षणाचे आयोजन केले आहे. त्यामुळे परीक्षांवर परिणाम होणार असल्याने हे प्रशिक्षण तातडीने स्थगित करावे, अशी मागणी शिक्षक परिषद मुंबई उत्तर विभागाचे अध्यक्ष अनिल बोरनारे यांनी केली आहे.याबाबत त्यांनी मुंबईच्या प्रादेशिक विद्या प्राधिकरणाला पत्र लिहिले आहे. इंग्रजी, गणित व विज्ञान विषयांचे हे चर्चासत्र आयोजित करण्यात आले असून, उत्तर, पश्चिम व दक्षिण विभागातील शिक्षण निरीक्षक कार्यालयाअंतर्गत येणाऱ्या खासगी अनुदानित व मुंबई महापालिकेतील माध्यमिक शाळांमधील शिक्षकांना या चर्चासत्राला उपस्थित राहण्याबाबत आदेश दिले आहेत.आजपासून १२ वीची परीक्षा सुरू झाली असून अनेक शाळांमध्ये परीक्षा केंद्र असल्याने परीक्षेचे पर्यवेक्षण शिक्षकांना करावे लागत आहे. यासोबतच १० वी भाषा विषयाच्या तोंडी परीक्षा, आयसीटी व विज्ञान विषयांचे प्रॅक्टिकल, श्रेणी विषयांचे अंतर्गत मूल्यमापन तसेच नियोजन यामध्ये शाळांमधील शिक्षक व्यस्थ असतानाच शिक्षकांना प्रशिक्षणाला पाठविले तर परीक्षांच्या कामावर त्याचा परिणाम होणार असल्याने प्रादेशिक विद्या प्राधिकारणाने तातडीने हे चर्चासत्र स्थगित करून १० वी व १२ वीच्या परीक्षा नंतर घेण्याची मागणी अनिल बोरनारे यांनी केली आहे.शिक्षणाच्या गुणवत्तावाढीसाठी हे चर्चासत्र गरजेचे असले तरी शाळांमधील सध्याचा परीक्षांचा काळ तितकाच महत्वाचा आहे, आमचा कोणत्याही प्रशिक्षणाला अथवा चर्चासत्राला विरोध नसून त्याच्या अधिक परिणामकारकतेसाठी परीक्षांच्या नंतर घेण्याची आवश्यकता असल्याचे अनिल बोरनारे यांनी सांगितले.