Join us

रेसकोर्सची जमीन हडपण्याचा प्रयत्न थांबवा; आदित्य ठाकरे यांचे राज्यपालांना पत्र

By जयंत होवाळ | Published: June 08, 2024 8:21 PM

रेसकोर्सच्या मोक्याच्या जागेचा पुनर्विकास करून त्याचा व्यावसायिक वापर करण्याचा प्रयत्न भाजप व शिंदे करत असल्याचा आरोपही ठाकरे यांनी यापूर्वी केला होता.

मुंबई - रेसकोर्सप्रकरणी उद्धवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे पुन्हा मैदानात उतरले आहेत. महालक्ष्मी रेसकोर्स आणि वेलिंग्डन क्लब संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपकडून होत असलेला राजकीय हस्तक्षेप थांबवावा, अशी विनंती त्यांनी राज्यपालांकडे पत्राद्वारे केली आहे.

रेसकोर्सवरून गेले काही महिने ठाकरे यांचा राज्य सरकारशी संघर्ष सुरू आहे. या मुद्यावर त्यांनी शिंदे यांना लक्ष्य केले आहे. आता त्यांनी थेट राज्यपालांकडे दाद मागितली आहे. वेलिंग्डन क्लबमध्ये मागितलेले ५० जणांचे सभासदत्व हे जणू भाडेपट्टीचे नूतनीकरण करण्यासाठी सरकारने घेतलेल्या लाचेसारखे आहे. हे सभासदत्व त्वरित रद्द केले पाहिजे. रेसकोर्सचा आराखडा नागरिकांना आणि सदस्यांना दाखवणार असल्याचेही सरकारने न्यायालयात सांगितले होते.

तथापि मुंबई महापालिका आता अधिकृतपणे जमीन ताब्यात घेऊ पाहतेय आणि काम सुरू करण्याच्या विचारात आहे. ही जमीन बळकावून ते काम शेवटी मुख्यमंत्री आणि भाजपच्या बिल्डर-कंत्राटदार मित्रांवर सोपण्याचा मनसुबा आहे. त्यामुळे राज्यपालांनी यात हस्तक्षेप करून ही लाचखोरी आणि जमीन हडपण्याचा प्रयत्न त्वरित थांबवावा, असे त्यांनी पत्रात म्हटले आहे.

रेसकोर्सच्या मोक्याच्या जागेचा पुनर्विकास करून त्याचा व्यावसायिक वापर करण्याचा प्रयत्न भाजप व शिंदे करत असल्याचा आरोपही ठाकरे यांनी यापूर्वी केला होता. मुंबईकरांच्या हक्काची २२६ एकर जागा विकासकांच्या घशात जाईल, अशीही भीती त्यांनी व्यक्त केली होती.

रेसकोर्स पुनर्विकासाचा प्रस्ताव असा...

रेसकोर्सच्या २२६ एकर जागेपैकी १२० एकर जागेवर पालिका थीम पार्क उभारणार आहे. १२० एकर जागेवर उद्यान साकारले जाणार असून ते सागरी किनारा मार्गावरील उद्यानाला भूमिगत मार्गाने जोडले जाणार आहे. महालक्ष्मी रेसकोर्सवर कोणतेही बांधकाम करण्यात येणार नाही. तेथील उद्यान आणि हिरवळ तशीच राहील, अशी ग्वाही पालिका आयुक्तांनी दिली आहे.

टॅग्स :आदित्य ठाकरेभाजपारमेश बैसएकनाथ शिंदे