मुंबई : ईव्हीएम मशीनचा गैरवापर होत असल्याने आगामी विधानसभा निवडणुका ईव्हीएमऐवजी मतपत्रिकेवर घेण्यात याव्यात, अशी मागणी वंचित बहुजन महासंघातर्फे करण्यात आली आहे. ईव्हीएमचा वापर बंद करण्यात आला नाही तर या मागणीसाठी राज्यभरात बंद पाळण्याचा इशारा वंचित बहुजन आघाडीतर्फे मंगळवारी पत्रकार परिषदेत देण्यात आला.आघाडीचे नेते व लोकसभा निवडणुकीतील पक्षाचे उत्तर मध्य मतदारसंघाचे उमेदवार डॉ. अब्दुल रहमान अंजारीया यांनी हा इशारा दिला. या वेळी पक्षाचे केंद्रीय सचिव रतन बनसोडे व मुंबई समन्वयक आनंद जाधव उपस्थित होते. ईव्हीएम हटवण्याच्या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीतर्फे सोमवारी राज्यभरात विविध ठिकाणी निदर्शने करण्यात आली.राज्यातील ३०० पेक्षा जास्त तहसीलदार कार्यालये, जिल्हाधिकारी कार्यालयांसमोर आघाडीतर्फे निदर्शने करण्यात आली. आघाडीच्या नेत्यांनी याबाबत राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी, संयुक्त निवडणूक अधिकारी व अतिरिक्त निवडणूक अधिकाऱ्यांची भेट घेऊन याबाबत चर्चा केली व त्यांना पक्षाची भूमिका सांगण्यात आली आहे.अधिकाऱ्यांनी ईव्हीएम मशीनला असलेला विरोध व त्याबाबतची माहिती केंद्रीय निवडणूक आयोगाला कळवण्याचे आश्वासन दिल्याचे डॉ. अंजारिया म्हणाले. सोमवारी मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर निहारिका खोंदले व कार्यकर्त्यांनी ईव्हीएम हटवण्याच्या मागणीसाठी निदर्शने केली.
'ईव्हीएमचा वापर बंद करा अन्यथा महाराष्ट्र बंद करणार'
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2019 1:40 AM