सफाई कामगारांचे काम बंद आंदोलन
By admin | Published: June 14, 2014 02:44 AM2014-06-14T02:44:45+5:302014-06-14T02:44:45+5:30
महापालिकेच्या कंत्राटी कामगारांनी प्रलंबित मागण्यांसाठी सामूहिक आंदोलन पुकारले आहे.
नवी मुंबई : महापालिकेच्या कंत्राटी कामगारांनी प्रलंबित मागण्यांसाठी सामूहिक आंदोलन पुकारले आहे. मुंबई येथे हे आंदोलन होत असल्याने नवी मुंबईमधील रस्त्यांवरील कचरा उचलला जात नसल्याचे तेथे कचऱ्याचे ढीग साचल्याचे दिसत आहे. त्यामुळे नागरिकांवर दुर्गंधीला सामोरे जाण्याचा प्रसंग उद्भवला आहे.
नवी मुंबई महापालिका क्षेत्रात गेले काही महिने कचरा वाहतुकीची बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. घनकचरा वाहतूक कंत्राटी कामगार व ठेकेदार यांचे सातत्याचे काम बंद आंदोलन हे नागरिकांना त्रासदायक ठरू लागले आहे. गेल्या काही महिन्यात अनेकदा झालेल्या अशा आंदोलनांमुळे पालिकेपुढे साफसफाईचा प्रश्न निर्माण झाला आहे. अशातच पुन्हा एकदा हा प्रसंग पालिकेपुढे निर्माण झाला आहे. आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी पालिकेच्या कंत्राटी सफाई कामगारांनी सामूहिक रजा आंदोलन पुकारून मुंबई येथे आंदोलन सुरु केले आहे. त्यामुळे गेले दोन दिवस शहरातील कचरा उचलला जात नसल्याने ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग साचल्याचे दिसत आहेत. ऐन पावसाळ्याच्या तोंडावर होत असलेल्या या प्रकाराने नागरी आरोग्याची चिंता सतावू लागली आहे. त्यामुळे मनविसेचे शहर अध्यक्ष शिरीष पाटील यांनी संताप व्यक्त करत या परिस्थितीला प्रशासनाला जबाबदार धरले आहे. ठिकठिकाणी साचलेला हा कचरा वेळीच न उचलला गेल्यास आरोग्य धोक्यात येवून साथीचे रोग पसरण्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केली आहे. सानपाडा परिसरात सर्वच कचरा कुंड्यांच्या ठिकाणी कचरा पडून असल्याचा संताप देखील त्यांनी व्यक्त केला. (प्रतिनिधी)