आरेतील झाडे तोडण्याचे काम थांबवले, अन्य कामे सुरूच ठेवणार; एमएमआरसीएलची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2019 02:34 AM2019-10-08T02:34:26+5:302019-10-08T02:46:15+5:30
न्यायालयीन प्रकरणे आणि अन्य अडचणींमुळे प्रकल्पाच्या कारशेडच्या कामाला ठरलेल्या तारखेहून सहा महिने विलंब झाला.
मुंबई : मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडतर्फे (एमएमआरसीएल) आरे कॉलनीमध्ये मेट्रो- ३ मार्गिकेच्या कारशेडसाठी झाडे तोडण्यात येत होती, आतापर्यंत २ हजार १४१ झाडे तोडून झाली आहेत. यामुळे सर्वोच्च न्यायालयात दिलेल्या आश्वासनानुसार यापुढे आम्ही तेथील आणखी झाडे तोडणार नसल्याचे एमएमआरसीने स्पष्ट केले. मात्र तोडलेल्या झाडांना तेथून हटवण्याचे काम सुरू राहील आणि ते पूर्ण झाले की कारशेडचे बांधकाम सुरू करण्यात येईल, असे सांगण्यात आले.
सोमवारी सकाळी सर्वोच्च न्यायालयामध्ये झालेल्या कामकाजानंतर केलेल्या ट्विटमध्ये कॉर्पोरेशनच्या प्रवक्त्याने असे म्हटलेकी, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाबद्दल आम्हाला आदर आहे आम्ही त्याचे कसोशीने पालन करू, मात्र ७ आॅक्टोबर रोजी उच्च न्यायालयाने निकाल दिल्यानंतर आरेमधील २१४१ झाडांची तोडणी झाली आहे. ती तेथून हटवण्याचे काम मात्र सुरूच राहणार आहे. आरेतील वृक्षतोडीची भरपाई करण्यासाठी एमएमआरसीएलने यापूर्वी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामध्ये २३,८४६ झाडे लावली असून २५ हजार रोपांचे वाटपही करण्यात आल्याचे एमएमआरसीएलने स्पष्ट केले.
न्यायालयीन प्रकरणे आणि अन्य अडचणींमुळे प्रकल्पाच्या कारशेडच्या कामाला ठरलेल्या तारखेहून सहा महिने विलंब झाला. तरीही हे काम वेळेत पूर्ण करू असा निर्धारही एमएमआरसीएलने व्यक्त केला.
‘त्या’ आंदोलकांची सुटका
आरेतील वृक्षतोडीविरुद्ध आंदोलन करणाऱ्या २९ जणांना शनिवारी अटक करत त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. यापैकी २४ आंदोलकांना ठाण्याच्या मध्यवर्ती कारागृहात, तर ५ जणांना भायखळा कारागृहात ठेवण्यात आले होते. रविवारी त्यांना जामीन मंजूर झाल्यानंतर, रात्री उशिराने त्यांची कारागृहातून सुटका करण्यात आली. या वेळी त्यांच्या भेटीसाठी मित्रमंडळी कारागृहाबाहेर तळ ठोकून होती. आंदोलक बाहेर पडताच त्यांनी जल्लोष केला.
‘आरे कन्झर्व्हेशन ग्रुप’ने देणगीतून भरली जामिनाची रक्कम
कुलाबा-वांद्रे-सीप्झ या भुयारी मेट्रोच्या कारशेडसाठी आरे कॉलनीतील २ हजारांहून अधिक झाडे तोडली गेली. शुक्रवारच्या रात्री आंदोलनकर्त्यांनी मेट्रो प्रशासनाच्या कामात अडथळा आणल्यामुळे पोलिसांनी २९ आंदोलकांना अटक केली. आंदोलकांवर चार कलमे लावून त्यांना दोन दिवस कारागृहात ठेवण्यात आले. मात्र, रविवारी सुट्टीकालीन न्यायालयाने २९ आंदोलकांना सात हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला. या आंदोलकांच्या जामिनाची रक्कम ही ‘आरे कन्झर्व्हेशन ग्रुप’ने देणगीतून भरली.
आरे कन्झर्व्हेशन ग्रुपचे सदस्य रोहित जोशी यांनी यासंदर्भात सांगितले की, पर्यावरण वाचविणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. या विद्यार्थ्यांनी आपल्या जीवाची, आयुष्याची पर्वा न करता पर्यावरणाच्या रक्षणासाठी धाव घेतली, ही खरेच कौतुकास्पद बाब आहे. मुंबईकरांची ढाल बनण्याचे काम हे या २९ आंदोलकांनी केले. कशा प्रकारे दडपशाही सुरू आहे, हे मुंबईकरांनी स्वत:च्या डोळ्यांनी पाहिले. २९ आंदोलकांच्या जामिनाची रक्कम ही देणगीच्या स्वरूपात जमा करून त्यांना द्यावी, असे आवाहन आरे कन्झर्व्हेशन ग्रुपच्या वतीने करण्यात आले होते.
आरे कन्झर्व्हेशन गु्रपने पाच लाख रुपयांची रक्कम साठवून ठेवली होती. सुरुवातीला १५ हजार रुपयांच्या जामिनाची रक्कम ठरली होती. आंदोलकांच्या जामिनाचा रक्कम आणि वकिलांचे मानधन अशी एकूण ५ लाख रुपयांची रक्कम जमा करण्यात आली होती. २९ आंदोलकांच्या सात हजार रुपये जामीन रकमेप्रमाणे २ लाख ३० हजार रुपये जमा करून दोन दिवसांत त्यांना परत केली जाईल. २९ आंदोलकांमध्ये एक दिल्लीचा मुलगा होता. तो मुंबईत शिकायला आहे. त्याचे आईवडील वेळोवेळी गु्रपच्या सदस्यांसोबत संपर्कात राहून मुलाची माहिती घेत होते, असे जोशी यांनी सांगितले.