"दौरा थांबवून मुंबईकडे निघतोय; मनोहर जोशींच्या निधनानंतर संजय राऊतांकडून शोक
By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2024 08:19 AM2024-02-23T08:19:35+5:302024-02-23T09:15:40+5:30
शिवसेना प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनीही जोशींच्या निधनावर दु:ख व्यक्त केले.
मुंबई - शिवसेनेचे पहिले आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे निधन झाले आहे. आज २३ फेब्रुवारी २०२४ रोजी पहाटे ३.०२ मिनिटांनी हिंदुजा हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. २१ फेब्रुवारी रोजी त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने हिंदुजा हॉस्पिलमध्ये ऍडमिट केले होते. त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याचे निदान झाल्याने त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. अखेर, त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाने शिवसेना परिवारावर शोककळा पसरली आहे. तर, शिवसैनिकांकडून त्यांना श्रद्धांजली अर्पण केली जात आहे. शिवसेना प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनीही जोशींच्या निधनावर दु:ख व्यक्त केले.
शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे दोन दिवसांच्या विदर्भ दौऱ्यावर असून ते बुलढाणा जिल्ह्यात विविध ठिकाणी कार्यक्रमासाठी गेले आहेत. मात्र, मनोहर जोशींच्या निधनाचे वृत्त समजताच त्यांनी आजचे सर्वच कार्यक्रम रद्द केले असून ते मुंबईकडे निघाले आहेत. ''आज आम्ही जरी दौऱ्यावर असलो तरी दौरा थांबवून मुंबईकडे निघतोय, राज्यभरातून, देशभरातून डॉ. मनोहर जोशींना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली जात आहे.'', असे माहिती संजय राऊत यांनी दिली.
एक नगरसेवक ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, लोकसभेचे सभापती पदापर्यंतची मोठी पदं त्यांनी शिवसेनेच्या माध्यमातून भूषवली. शुन्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्त्व म्हणजो जोशी सर होते. ते आमचे आदर्श होते, कडवट शिवसैनिक होते. यशस्वी उद्योजकही होते, मराठी माणसांनी त्यांच्याकडून उद्योगशीलता शिकली पाहिजे, असे म्हणत राऊत यांनी जोशींच्या आठवणी जागवल्या.
शून्यातून विश्व निर्माण करणारे..
— Sanjay Raut (@rautsanjay61) February 23, 2024
कडवट महाराष्ट्र अभिमानी
अखेरच्या श्वासा पर्यन्त शिवसैनिक म्हणुन जगलेले
मनोहर जोशी यांना विनम्र अभिवादन! pic.twitter.com/QV48ikmWv1
बाळासाहेबांनी एक ब्राह्मण मुख्यमंत्री केला म्हणून त्यांच्यावर टीका केली गेली. पण, बाळासाहेबांनी कधीही कोणाची जात पाहिली नाही, केवळ त्यांचं कर्तृत्व पाहिलं. बाळासाहेबांचा कडवट शिवसैनिक म्हणून ते शेवटच्या श्वासापर्यंत जगले, असेही राऊत यांनी म्हटले.
दरम्यान, बुलढाणा जिल्ह्यातील जनसंवाद दौऱ्यानिमित्त २२ आणि २३ फेब्रुवारी या दोन दिवस उद्धव ठाकरे विदर्भ दौऱ्यावर आहेत. या दोन दिवसीय दौऱ्याच्या दरम्यान उद्धव ठाकरेंच्या ५ जनसंवाद सभांचे आयोजन करण्यात आले आहे. मात्र, आजचे त्यांचे सर्व कार्यक्रम रद्द झाले असून ते मुंबईत मनोहर जोशींच्या अंत्यदर्शनाला येत आहेत. त्यांच्यासमवेत शिवसेना खासदार संजय राऊत व पदाधिकारीही मुंबईत परत येत आहेत.
शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
मनोहर जोशींचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी माटुंगा पश्चिम, रुपारेल कॉलेज जवळील W54 या त्यांच्या सध्याच्या निवासस्थानी सकाळी ११ ते दुपारी २ या वेळात ठेण्यात येणार आहे. दुपारी २ नंतर अंत्ययात्रेला सुरुवात होईल. दादर स्मशानभूमीत शासकीय इतमामात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होतील, अशी माहिती आहे.
मनोहर जोशींची कारकीर्द
माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचा जन्म २ डिसेंबर १९३७ ला रायगड जिल्ह्यातील नांदवी या गावी झाला. १९९५ या वर्षी ते युतीच्या सत्तेत राज्याचे मुख्यमंत्री होते. मनोहर जोशी यांनी मुंबई महापालिकेचे नगरसेवक, महापौर, विधान परिषदेचे सदस्य, आमदार, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, खासदार, केंद्रीय अवजड उद्योगमंत्री, लोकसभा अध्यक्ष आणि राज्यसभा सदस्य अशा विविध पदांवर काम केलं आहे. आजारपणामुळे ते गेल्या काही महिन्यांपासून राजकारणात सक्रिय नव्हते. मनोहर जोशी हे शिवसेनेचे पहिल्या फळीतील नेते होते. ते बाळासाहेब ठाकरे यांचे निकटवर्तीय होते.