Join us

स्टोअरकीपर ते मिशीवाला कवी; नायगावकरांचा अनोखा प्रवास

By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2021 9:22 AM

Ashok Naigaonkar : लोकप्रिय हास्यकवी अशोक नायगावकर हे बुधवारी वयाच्या पंचाहत्तरीत प्रवेश करत आहेत. त्यानिमित्त त्यांचे सहकारी आणि ज्येष्ठ कवी महेश केळुसकर यांनी व्यक्त केलेले शब्दचित्र...

..तर वाईचे मिशीवाले हशावाले अशोक तशा विनायक नायगावकर हे आज ७४ पावसाळे (आणि उन्हाळेही) बघून झाल्यावर रीतसर हाती-पायी धड असे ठणठणीत लोकप्रिय कवी पंच्याहत्तरीत एन्ट्री करत आहेत. बँक ऑफ बडोदामध्ये ३१ वर्ष स्टेशनरी स्टोअर कीपर ते कॅशियर अशी नोकरी करून त्यांनी स्वेच्छा निवृत्ती घेतली. त्यालाही आता वर्षं लोटलीत, पण नायगावकरांनी अजून कवितांमधून निवृत्ती घेतलेली नाही आणि आपली शंभरी पूर्ण करीपर्यंत ते तशी घेतील असं वाटत नाही. अजूनही त्यांना नव्या कविता स्फुरत असतात, नवे विनोद सुचत असतात आणि मुख्य म्हणजे नवे कवी, नवे लेखक ते कोणताही पूर्वग्रह न ठेवता वाचत असतात, हे त्यांच्या नित्यनूतन ऊर्जा प्रवाहाचं रहस्य असावं.

१९९२ मध्ये नायगावकरांचा ‘वाटेवरच्या कविता’ हा कविता संग्रह प्रकाशित झाला. त्यानंतर कुठलाही  संग्रह त्यांच्या नावावर आलेला नाही. पुढे येईल की नाही, माहित नाही. ९२ पूर्वीच्या आणि नंतरच्या दोन कवितासंग्रह होतील एवढ्या कविता त्यांच्या या सुप्रसिद्ध खाकी मळकट कापडी पिशवीत तुम्हाला सापडतील. पण तुम्ही ‘झकास संग्रह काढतो नायगावकर आमच्याकडे द्या’ असे म्हणून बघा. लगेच ती पिशवी ते दडवून ठेवतील नि विषयांतर करून तुमच्या तोंडावर आजचे सुभाषित फेकतील ‘‘दुसरी बायको सोडून गेल्याशिवाय पहिल्या बायकोचे महत्त्व कळत नाही.’’

नवा कवितासंग्रह नाही, पण  २००२-२००३ या काळात त्यांनी लिहिलेल्या निवडक लेखांचा संग्रह लवकरच अनघा प्रकाशनातर्फे वाचकांसमोर येत आहे. महेश  केळुसकर आणि श्रीकांत बोजेवार यांनी ते पुस्तक संपादित करावं, अशी नायगावकरांनी इच्छा व्यक्त केली आणि त्याप्रमाणे आम्ही काम सुरू केलेलं आहे. ‘लोकमत’च्या माध्यमातून या इथे पहिल्यांदाच ही आनंदवार्ता खुली होत आहे. स्वातंत्र्याचं आणि नायगावकरांचं अमृतमहोत्सवी वर्ष समांतर चालू असताना, पत्रकार प्रशांत डिंगणकरच्या सहकार्याने हे जुने लेख आम्ही मिळवू शकलो आणि स्वतंत्रपणे संग्रह काढण्याचे स्वातंत्र्य नायगावकरांनी आम्हास दिले, हे नाही म्हटले तरी एक आश्चर्यच आहे.

लोकप्रियतेची हवा डोक्यात गेलेले अनेक लेखक-कवी-कलावंत मी पाहिले आहेत. त्यांचे नखरे बघितले आहेत. पण नायगावकर अजून  पूर्वीसारखेच आहेत. साधेसुधे, जाडेभरडे. दुसऱ्याची पीडा आणि दु:ख ऐकून कळवळणारे, साधी भाजी-भाकरी आणि मठ्ठा असला की खूश असणारे, आपलं नाव न फोडण्याच्या अटीवर कुठल्या ग्रंथालयांना, संस्थांना, अडचणीतल्या गरीब विद्यार्थ्यांना आणि वृद्धांना यथाशक्ती मदत करणारे, निमंत्रण नसतानाही एखाद्या त्यांना हव्या असलेल्या कार्यक्रमाला अचानक जाऊन खाली जमिनीवर मांडी घालून बसणारे... हे असं आतून संन्यस्त होणं फार कमी जणांना जमतं. विष पिऊन अमृत वाटत फिरणारे नायगावकरांसारखे तर खूपच कमी आहेत.

 

टॅग्स :अशोक नायगावकर