Join us  

विना परवाना औषधांचा साठा जप्त

By admin | Published: February 05, 2017 1:41 AM

डॉक्टर नसताना लोकांची फसवणूक करत, विना परवाना औषधाचा साठा करून औषधे विकणाऱ्या रायगड जिल्ह्यातील एका व्यक्तीविरुद्ध अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए)

मुंबई : डॉक्टर नसताना लोकांची फसवणूक करत, विना परवाना औषधाचा साठा करून औषधे विकणाऱ्या रायगड जिल्ह्यातील एका व्यक्तीविरुद्ध अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) कारवाई केली आहे. या कारवाईमध्ये या व्यक्तीकडून विना परवाना ९० हजार रुपयांचा औषधांचा साठा जप्त करण्यात आला आहे. या व्यक्तीविरुद्ध न्यायालयात खटला दाखल करण्यात येणार असल्याची माहिती एफडीए कडून देण्यात आली.रायगडमधील पित्तळवाडी येथे राहणारे चंद्रशेखर श्रृंगारपुरे हे डॉ. नाना या नावाने ओळखली जाते. चंद्रशेखर शासकीय रुग्णालयात औषध भांडारात काम करत होते. निवृत्तीनंतर त्यांनी औषधविक्री आणि बोगस वैद्यकीय व्यावसायिक म्हणून कामाला सुरुवात केली. चंद्रशेखर यांच्याकडून जप्त करण्यात आलेल्या साठ्यात सलाइन, वेदनाशामक औषधे, विविध अँटिबायोटिक्स, स्टिरॉइड्स, झोपेसाठी वापरण्यात येणाऱ्या औषधांचा साठा जप्त करण्यात आला. याविषयीची माहिती मिळाल्यावर, एफडीएकडून एक बोगस रुग्ण या व्यक्तीकडे पाठवण्यात आला. बोगस रुग्णाला चंद्रशेखर यांनी अँटिबायोटिक कॅप्सूल, वेदनाशामक गोळ््या आणि स्टिरॉइड्सच्या गोळ््या अशी ६ औषधे दिली. या औषधांची रोख रक्कम स्वीकारली. यानंतर, एफडीएच्या वि. ब. तासखेडकर आणि भ. अ. म्हानवर या औषध निरीक्षकांनी पोलिसांच्या मदतीने एफडीए आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई केली. चंद्रशेखर यांच्याविरुद्ध अलिबाग न्यायालयातून कस्टडी आॅर्डर घेण्यात आली आहे. चौकशी करून यांच्याविरुद्ध न्यायालायात खटला दाखल करण्यात येणार आहे. या व्यक्तीकडून औषध पुरवठा करणाऱ्या व्यक्तीची माहिती घेण्यात येणार आहे. या व्यक्तीला ३ ते ५ वर्षे शिक्षा व जप्त केलेल्या मुद्देमालाच्या तिप्पट म्हणजे २ लाख ७० हजार इतका दंड होऊ शकतो, अशी माहिती एफडीएचे सहायक आयुक्त चंद्रशेखर साळुंखे यांनी दिली. (प्र्रतिनिधी)