आविष्कार देसाई
अलिबाग : निसर्ग चक्रीवादळ जाऊन आज सहा दिवस लोटले आहेत. मात्र रायगडवासीयांच्या मनामध्ये अद्यापही वादळाचे माजलेले काहूर शांत झालेले नाही. सरकारच्या मदतीकडे सारे डोळे लावून बसले आहेत. पंचनाम्याची फुटपट्टी न लावता तातडीने थेट आपादग्रस्तांच्या हातात मदत देण्याची हीच ती वेळ आहे. हे सरकारने आता ध्यानात घ्यावे, अन्यथा रायगडवासी कधीच उभा राहू शकणार नाही.
निसर्ग चक्रीवादळानंतरची जिल्ह्यातील परिस्थिती अतिशय भयाण झाली आहे. लाखो नागरिकांच्या घरांच्या भिंती पडल्या आहेत, घरांचे छप्पर वादळात उडून गेले आहे. धरणीची उशी आणि आभाळाचे पांघरूण घेण्याची वेळ त्यांच्यावर आलेली आहे. सरकारने जाहीर केलेली तातडीची मदत जलदगतीने पोहोचणे गरजेचे आहे, मात्र प्रशासनाने नुकसानीचे मोजमाप करण्यासाठी लावलेली पंचनाम्याची फुटपट्टी अद्याप संपलेली नाही.वादळाचा आघातच महाभयानक होता. त्यामुळे हजारो विजेजे पोल, तारा पडल्या आहेत. लाखोंच्या संख्येने झाडे आडवी झाल्याने या ठिकाणची वीज आणि रस्ते सुरळीत करण्याचे प्रयत्न प्रशासनाकडून सुरू आहेत. रायगडच्या मदतील अन्य जिल्ह्यांतील काही टीम आलेल्या आहेत. नारळ, सुपारी, आंबा, काजू यांच्या बागा पार उद्ध्वस्त झाल्या आहेत. त्यामुळे बागायतदारांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले आहे. कृषी विभागानेही पंचनामे सुरू केले आहेत; परंतु अख्ख्या बागाच जमिनीवर झोपल्याने पंचनामे करतानादेखील अडचणी येत आहेत. पंचनाम्यांचे सत्र संपत नाही तोपर्यंत नुकसानीची मदत मिळणे अशक्य आहे, हे आता रायगडकरांना कळून चुकले आहे. सध्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी विविध राजकीय पक्षांचे नेते, पदाधिकारी मोठ्या संख्येने जिल्ह्यात येत आहेत. नेत्यांच्या सहानुभूतीने रायगडवासीयांवर आलेली आपत्ती दूर होणार नाही. मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेली १०० कोटी रुपयांची तातडीची आर्थिक मदत अद्याप काही ठिकाणी पोहोचलेली नाही. सबंध कोकणामध्ये पाच हजार कोटी रुपयांच्या आर्थिक पॅकेजची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे यांनी सरकारकडे केली आहे.आपत्तीमध्ये सापडलेल्यांना सरकार आणि प्रशासनाला मदत करायची असेल तर त्यांनी चाकोरीबाहेर जाऊन मदत करणे गरजेचे आहे. नुकसान दिसत असताना त्याची कागदपत्रे, आधारकार्ड, बँक पासबुक, रेशनकार्ड यांच्या मागे न लागता थेट मदत देण्याची हीच वेळ आहे, हे समजून घेणे गरजेचे आहे. असे केले तरच रायगडातील आपत्तीत सापडलेला माणूस पुन्हा ताठ उभा राहू शकेल.