मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये सध्या जोरदार वादळी वारे सुटल्याचं पाहायला मिळत आहे. सोबतच पावसालाही सुरुवात झाली आहे. मुलुंड, भांडूप, कुर्लासह अंधेरी, गोरेगाव, कांदिवलीतही वादळी वारा सुटला आहे. हवामान खात्यानं पुढील दोन ते तीन तासांता वादाळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा इशारा दिला आहे. वादळी वाऱ्यांमुळे दृश्यमानता कमी झाली आहे. याचा परिणाम मुंबई विमानतळावर झाला आहे. मुंबई विमानतळाचा रनवे बंद करण्यात आला आहे.
मुंबई उपनगरांत वादळी वाऱ्यांमुळे काही ठिकाणी वीज पुरवठा खंडीत झाल्याचीही माहिती समोर आली आहे. मुलुंड, भांडूपच्या काही भागांमध्ये वीज पुरवठा खंडीत झाला आहे. दुसरीकडे ठाणे, कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर भागात वादळी वाऱ्यांसह जोरदार पाऊस कोसळत आहे.
मुंबई शहर आणि उपनगरासाठी पुढीत तीन तासांसाठी वादळी वाऱ्यांसह पावसाचा इशारा देण्यात आला असून उंच झाडांपासून दूर राहण्याचं आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आलं आहे.
मुंबई मेट्रो-१ सेवा ठप्पवादळी वारे आणि पावसाचा फटका घाटकोपर-वर्सोवा मेट्रो सेवेलाही बसला आहे. मेट्रो लाइनच्या ट्रॅकवर बॅनर पडल्यामुळे मेट्रो सेवा ठप्प झाल्याची माहिती समोर आली आहे.