माणसाचे जीवन अनमोल आहे. त्यामुळे जीवघेणी सेल्फी काढून काहीतरी पराक्रमी विक्रम करण्याचा मोह आपण टाळला पाहिजे. इतरांनाही त्यापासून परावृत्त केले पाहिजे.
........................................
हल्ली आपल्या मोबाइलवरून आपले स्वत:चे किंवा आपल्या ग्रुपचे फोटो काढण्याचे फॅड खूपच वाढलेले आहे. मोबाइलवर उपलब्ध असणाऱ्या सुविधांचा यथायोग्य वापर करण्यात वाईट असे काहीच नसते. पण, कधी कधी असे सेल्फी फोटो काढणे नुसते महागात पडते असे नाही, तर ते जीवावरही बेतते! कधी कुणी सेल्फीच्या नादात अक्षरश: दरीत कोसळतो, तर कुणी समुद्रात बुडतो! कुणी कोसळत्या धबधब्यात वाहून जातो, तर कुणी धावत्या ट्रेनखाली चिरडलाही जातो!
गुहागर येथील बामणघळीत लाटेसोबत मौजमजा करताना ठाण्यातील तरुण दाम्पत्याला जीव गमवावा लागल्याची घटना घडली. सेल्फीच्या नादात दुर्घटना झाल्याची ही काही पहिलीच वेळ नाही. राज्यभरात, देशभरात अशा अनेक घटना सातत्याने घडत आहेत. धोक्याच्या ठिकाणी जाऊन ‘स्वचित्र’ काढण्याच्या या मोहामुळे अनेक युवक-युवतींचे बळी गेले आहेत. सेल्फी काढताना आजूबाजूचे भान सोडा, आपण देहभानही विसरून जातो. इतकी आत्ममग्नता आपल्यात कशामुळे आली, याचा शोध घेण्याची गरज आहे. कुठल्याही गोष्टीचा अतिरेक हा घातकच. आपला कोणताही छंद पूर्ण करीत असताना सुरक्षिततेला प्राधान्य देण्याची गरज आहे. सेल्फी म्हणजे आता प्रत्येकाच्या आयुष्याचा दैनंदिन भाग बनला आहे. त्यात काही वाईटही नाही. पण, हा नाद जीवघेणा ठरणार नाही याची दक्षता आपण घेतलीच पाहिजे.
जेव्हा कॅमेरा नावाची गोष्ट अस्तित्वात नव्हती तेव्हाही राजे-महाराजे आपली प्रतिमा चित्रकाराकडून बनवून घेत असत. जसजसा काळ बदलत गेला तसतसे ‘फोटो’ काढण्याच्या पद्धतीही बदलत गेल्या. एखाद्या समारंभात किंवा स्टुडिओमध्ये जाऊन फोटो काढण्याचा ‘ट्रेंड’ काही काळ होता. परंतु नंतर स्मार्टफोनचे युग आले आणि सर्वसामान्यांसाठी दुर्मीळ असणारा कॅमेरा प्रत्येकाच्या खिशात जाऊन पोहोचला. त्यामुळे फोटो काढणे अधिक सुलभ झाले आणि ‘सेल्फी’ हा शब्द आणखी प्रचलित बनला. या सेल्फीला पोस्ट करण्यासाठी सोशल मीडिया नावाचे व्यासपीठ मिळाल्याने आपण कोणत्या ठिकाणी आहोत किंवा कोणत्या परिस्थितीत आहोत, आपल्या चेहऱ्यावरचे हाव-भाव काय आहेत, याचे कोणतेही भान न ठेवता सेल्फी काढायचा आणि तो सोशल नेटवर्किंग साईटवर टाकायचा, असे नवीन फॅड सध्या आले आहे. सेल्फीच्या नादात आपण किती असुरक्षित झालोय हेसुद्धा त्यांना उमगत नाही. अर्थात, काळानुरूप बदलून नव्या ट्रेंडचा भाग होणे ही एक चांगलीच गोष्ट म्हटली पाहिजे. त्यामुळे ‘सेल्फी’प्रेमाला विरोध करण्याचे येथे काहीच औचित्य नाही. परंतु आपले ‘सेल्फी’प्रेम जोपासताना परिस्थितीचे तारतम्य आणि जीवाची सुरक्षितता आपण ठेवली पाहिजे.
सेल्फीसाठी अनमोल अशा आयुष्याची माती करणे योग्य आहे का? सेल्फी कितीही काढता येतील, मात्र सेल्फीच्या नादात गमावलेला जीव मिळत नाही. त्यामुळे सेल्फीच्या या जीवघेण्या चौकटीला किती महत्त्व द्यायचे, यावर सर्वांनी गांभीर्यपूर्वक विचार करावा, एवढीच अपेक्षा..!
- स्वप्निल कुलकर्णी (लेखक लोकमत मुंबई आवृत्तीत उपसंपादक आहेत.)