सुहास शेलारमुंबई : असंख्य लाटांचा मारा सहन करूनही गेली ३४० वर्षे ऐटीत उभा असलेला कुलाबा किल्ला (अलिबाग) म्हणजे मराठा स्थापत्य शैलीचे सर्वोत्तम उदाहरण. १९ मार्च १६८० रोजी छत्रपती शिवाजी महाराजांनी या किल्ल्याच्या बांधणीचे आदेश जारी केले आणि २१ मार्चपासून प्रत्यक्षात काम सुरू झाले. मात्र, पुढच्या काही दिवसांत महाराजांचे देहावसान झाले. त्यांनी पाहिलेले वास्तू उभारणीचे शेवटचे स्वप्न म्हणूनही कुलाबा किल्ला ओळखला जातो.
पुढे छत्रपती संभाजी महाराजांच्या आज्ञेनुसार १६८१ साली या किल्ल्याचे काम जलदगतीने पूर्ण करण्यात आले. कुलाबा किल्ल्याला सरखेल कान्होजी आंग्रे यांच्यामुळे महत्त्व प्राप्त झाले. कारण त्यांनी भारतात हातपाय पसरू पाहणाऱ्या इंग्रज आणि पोर्तुगीजांपासून स्वराज्याचे संरक्षण करण्यासाठी मराठ्यांच्या आरमाराचे मुख्यालय सिंधुदुर्गहून कुलाबा किल्ल्यावर हलवले. त्यामुळे इंग्रजांना मुंबईच्या सीमेपलीकडे आणि पोर्तुगीजांना चौल बंदरापुढे सरकता येईना.
कुलाबा किल्ल्यावरील हुकूमतीच्या जोरावर कान्होजी आंग्रे यांनी मुंबई ते विजयदुर्गपर्यंत पश्चिम किनारपट्टीवर आपले एकहाती वर्चस्व राखले. आंग्रे यांच्या सत्तेला सुरुंग लावण्यासाठी कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या पोर्तुगीज आणि इंग्रजांनी हातमिळवणी केली. पाच हजार सैन्यानिशी कुलाबा किल्ल्यावर हल्ला करण्याची योजना त्यांनी आखली. परंतु, मराठ्यांच्या सागरी आणि लष्करी सामर्थ्याच्या जोरापुढे त्यांना पळ काढावा लागला. कान्होजी राजेंनंतर त्यांच्या वंशजांनी हा किल्ला अबाधित राखला. परंतु, पेशवाईच्या अस्तानंतर अन्य मराठा साम्राज्याप्रमाणे कुलाबा किल्लाही ब्रिटिशांच्या ताब्यात गेला.
किल्ल्याची वैशिष्ट्ये...कुलाबा किल्ल्याचे बांधकाम करताना चुन्याचा वापर करण्यात आलेला नाही. अवजड दगड एकावर एक रचून अचूक सांधेजोडणी करण्यात आली आहे.लाटांच्या माऱ्यामुळे तटबंदीच्या दगडांची झीज होऊ नये यासाठी दोन दगडांमध्ये छोटी पोकळी ठेवली आहे. या पोकळ्यांच्या आत पाणी जाऊन लाटांची मारक क्षमता शिथील व्हावी, हा त्यामागील उद्देश होता. या तंत्रपद्धतीच्या अवलंबामुळे अन्य जलदुर्गांप्रमाणे कुलाबा किल्ल्याच्या तटबंदीच्या दगडांची फारशी झीज झालेली दिसून येत नाही. मराठ्यांच्या स्थापत्य शैलीचे असे उदाहरण अन्य कोणत्याही किल्ल्यावर पहायला मिळत नाही.