कहाणी आधुनिक नवदुर्गेची : गुन्हेगारांचे ‘दात’ घशात घालणाऱ्या केईएमच्या डॉ. हेमलता पांडे
By संतोष आंधळे | Published: September 26, 2022 10:37 AM2022-09-26T10:37:04+5:302022-09-26T10:38:14+5:30
नवरात्रीच्या निमित्ताने आजपासून लोकमत वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या नऊ महिलांच्या कार्याची आपल्याला ओळख करून देणार आहोत. या सदरातून आपल्या भेटीला येतील वेगवेगळ्या प्रेरणादायी महिलांच्या कहाण्या...
मुंबई : वैद्यकीय क्षेत्रात महिला डॉक्टर म्हटले की स्त्रीरोगतज्ज्ञ, रेडिओलॉजिस्ट आणि त्वचारोगतज्ज्ञ या विद्याशाखांत महिला मोठ्या प्रमाणात आढळून येतात. मात्र, डॉ. हेमलता पांडे यांनी या पारंपरिक विद्याशाखांना बगल देत पोलिसांना त्यांच्या तपासात आपल्या वैद्यकीय ज्ञानाचा फायदा व्हावा, याकरिता दंत न्यायवैद्यकशास्त्र विषयाचे ज्ञान प्राप्त केले. गेल्या १० वर्षांत ५० हून अधिक प्रकरणांत त्यांनी पोलिसांना पुरावे गोळा करून दिले आहेत.
डॉ. हेमलता पांडे यांनी दंत न्यायवैद्यकशास्त्र या विषयात ज्ञान प्राप्त करण्याचा निर्णय घेतला, त्यावेळी भारतात या शाखेचा पदव्युत्तर अभ्यासक्रम उपलब्ध नव्हता. याकरिता त्यांनी लंडन येथील युनिव्हर्सिटी ऑफ साउथ वेल्स येथून दंत न्यायवैद्यक शास्त्राची पदव्युत्तर पदवी प्राप्त केली. त्या २०११ साली भारतात परत आल्या. त्यांचा खरा संघर्ष येथून सुरू झाला.
आपल्या संघर्षाबद्दल बोलताना डॉ. पांडे सांगतात, ‘ शिक्षण संपवून भारतात आल्यानंतर नोकरी शोधण्याचा प्रयत्न केला. पण मला कुठूनच प्रतिसाद मिळाला नाही. कारण ही पदवी संपादन करणारी मी एकमेव डॉक्टर होते. न्यायवैद्यकशास्त्र शाखा शवविच्छेदनाचे काम व्यवस्थित करते. दंत न्यायवैद्यकशास्त्र शाखा वेगळे काय करणार, असे सांगून मला कुणीच नोकरी दिली नाही. २०१३ मध्ये मी केईएम रुग्णालयातील न्यायवैद्यकशास्त्र विभागप्रमुख डॉ. हरीश पाठक यांना भेटले. त्यांनी पहिले सहा महिने काम बघू म्हणून हंगामी स्वरूपाची नोकरी दिली.’
डॉ. पांडे पुढे सांगतात, ‘त्या सहा महिन्यांत, कचरा वेचणाऱ्या एका महिलेवर सामूहिक बलात्काराची घटना घडली. त्या प्रकरणात आरोपी आणि त्या पीडित महिलेवर दातांचे चावे असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले. त्यावेळी पीडित महिला व संशयितांच्या दातांचे नमुने घेतले. दंत न्यायवैद्यकशास्त्राच्या आधारे दातांचे चावे संशयितांचेच असल्याचे कोर्टात सिद्ध केले. आरोपींना शिक्षा झाली. तेव्हापासून दंत न्यायवैद्यकशास्त्राचे महत्त्व अधोरेखित झाले. केईएम रुग्णालय प्रशासनाने मला सहायक प्राध्यापकाची नोकरी दिली. त्याबद्दल मी केईएम प्रशासनाची आभारी आहे.’
तीन दिवसांत गुंता सुटला
सन २०१७ मध्ये डॉ. हेमलता पांडे यांनी एका प्रकरणात केवळ कवटी असताना त्या चेहऱ्याची पुनर्रचना करून तपासाचा गुंता सोडवला. नऊ महिने अंबरनाथ पोलिसांना ज्या व्यक्तीची ओळख पटत नव्हती, ती त्यांनी केवळ तीन दिवसांत करून दिली. सध्या डॉ. पांडे ज्या वैद्यकीय महाविद्यालयांत या शाखेचे डिप्लोमा कोर्स आहेत, तेथील विद्यार्थ्यांना शिकवितात, कार्यशाळा घेतात. प्रगत देशांत ५०-६० वर्षे झालेला हा अभ्यासक्रम शिकविला जातो. मात्र, भारतात अजूनही कुठल्याही वैद्यकीय महाविद्यालयात या विषयातील पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम सुरू केलेला नाही.