संजीव साबडे, मुक्त पत्रकार -
मूळ मुंबई ही माहीम, वरळी, परळ, माझगाव, कुलाबा, छोटा कुलाबा आणि मुंबई या सात बेटांना जोडून तयार झाली. ती होती दक्षिण व मध्य मुंबई आणि ती पुढे साष्टी बेटाला जोडल्याने तयार झाली पश्चिम व पूर्व उपनगरे. म्हणजे संपूर्ण मुंबई शहर साष्टीसह आठ बेटांचं...
पश्चिम उपनगरांतून पूर्व उपनगरांकडे जाण्यापूर्वी मुंबईतील बेटांची माहिती घ्यायलाच हवी. मुंबई शहर व उपनगरांत आणि त्यापलीकडे बरीच बेटं होती. त्यांपैकी काही ज्ञात आहेत, तर काहींची माहिती मुंबईकरांनाच नाही. घारापुरी, बुचर (म्हणजे जवाहर) मढ, मार्वे ही बेटे माहीत आहेत. कारण तिथं वस्ती व वावर आहे. पण वांद्रे, वेसावे बेटाचं गाव व गावठाण झालं. ती साष्टी बेटाला आतून जोडली गेल्यानं त्यांचं बेट हे रूप नाहीसं झालं. मुर्ढे बेट कुठे हे कळत नाही आणि राई नावाचं बेट मीरा भाईंदर परिसरात असल्याची माहिती मिळते.
धारावी नावाचंही एक बेट उपनगरांत होतं. पण शीव (सायन) जवळच्या धारावीशी या बेटाचा अजिबात संबंध नाही. हे धारावी बेटही मीरा भाईंदर परिसरातच होतं. एस्सेलवर्ल्ड, वॉटर किंग्डम आणि पॅगोडा विपश्यना केंद्र जिथे आहे तो भाग धारावी बेटाचा. म्हणूनच बोरिवलीच्या गोराई किनारा व उत्तन - भाईंदर येथून बोटीने तिथं जावं लागतं. मिडल ग्राउंड बेट आहे गेट वे ऑफ इंडियापासून काहीशे मीटर अंतरावर, ठाणे खाडी परिसरात. ते नौदलाच्या ताब्यात असल्यानं तिथं जाता येत नाही. मुंबईकडे येणाऱ्या चाच्यांना अडवण्यासाठी इस्ट इंडिया कंपनीनेही तिथं केंद्र बनवलं आणि भंडारी पोलिसांच्या ताब्यात बेटाची सूत्रे दिली.
रामदास बोट बुडाली ते बेट...
ऑयस्टर बेटही दक्षिण मुंबईच्या समुद्रात आहे. तिथं आंतरराष्ट्रीय क्रुझ टर्मिनल उभारण्याची कल्पना होती. सुरक्षेच्या कारणास्तव नौदलाने ती अमान्य केली. क्रॉस नावाचं बेट भाऊचा धक्का आणि गेट वे ऑफ इंडियाच्या मध्ये समुद्रात आहे. ते आता ओळखलं जातं छिनाल टेकडी या नावानं. प्रत्यक्षात पोर्तुगीजांनी या टेकडीवजा बेटाला ख्रिश्चन टेकडी नाव दिलं आणि स्थानिकांच्या बोलण्यात त्याचा छिनाल असा अपभ्रंश झाला, असा अंदाज आहे. पूर्वी स्मगलिंगसाठी त्याचा वापर होत असे. गल नावाचं बेट रेवसच्या मार्गावर आहे. येथील खडकावर रामदास नावाची प्रवासी बोट १९४७ साली अमावास्येला धडकून बुडाली. त्यात असलेले कोकणातील ७०० ते ८०० प्रवासीही बुडून मरण पावले होते.
ट्रॉम्बेही होतं बेट
प्रॉंग्ज नावाचं एक बेट कुलाब्यापासून चार किलोमीटरवर आहे. तिथे जहाजांना मार्ग दाखवण्यासाठी टॉवरवर दिव्यांची व्यवस्था आहे. तोही भाग नौदलाच्या ताब्यात आहे. ट्रॉम्बे नावाचं गाव माहीत असलं तरी ते पूर्व उपनगरातील बेट होतं, हे अनेकांना माहीत नसेल. पाणजू बेटावर लोकवस्तीही आहे. अर्नाळा बेटावर किल्ला आणि त्यात सुमारे पाच हजार वस्ती आहे. समुद्राच्या लाटांमुळे किल्ला व बेटाची मोठ्या प्रमाणात धूप होत आहे. भौगोलिक मुंबईतील व लागून असलेल्या या बेटांची ही कथा व इतिहास आहे.