Join us

‘आविष्कार’च्या पन्नाशीत रंगली ‘प्रेमा’ची गोष्ट...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2021 4:06 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : प्रायोगिक रंगभूमीवरील मानाचे पान असलेल्या ‘आविष्कार’ या नाट्यसंस्थेने यंदाच्या वर्धापनदिनी वयाची पन्नाशी पूर्ण केली. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : प्रायोगिक रंगभूमीवरील मानाचे पान असलेल्या ‘आविष्कार’ या नाट्यसंस्थेने यंदाच्या वर्धापनदिनी वयाची पन्नाशी पूर्ण केली. यानिमित्ताने ‘आविष्कार’ परिवाराने सांस्कृतिक परंपरा जपण्यासोबतच संस्थेच्या पुढील वाटचालीचा आढावा घेतला. या अनुषंगाने आयोजित सोहळ्यात ‘आविष्कार’च्या व्यासपीठावर ‘प्रेमा’ची गोष्ट रंगली आणि ‘चंद्रशाला’च्या आठवणीही आविष्कृत झाल्या.

‘आविष्कार’च्या संस्थापकांपैकी एक असलेले ज्येष्ठ रंगकर्मी अरविंद देशपांडे यांचा ३४वा स्मृतिदिन आणि संस्थेचे सुवर्णमहोत्सवी वर्ष असा योग साधून, पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या सभागृहात एका सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. ‘आविष्कार’च्या पन्नास वर्षांच्या काळात, या संस्थेसाठी बहुमोल योगदान देणाऱ्या ज्येष्ठ रंगकर्मी प्रेमा साखरदांडे आणि सीताराम कुंभार यांचा यावेळी हृद्य सन्मान करण्यात आला.

‘आविष्कार’च्या स्थापनेपासून संस्थेत कार्यरत असणाऱ्या व आता वयाच्या नव्वदीत पोहोचलेल्या ज्येष्ठ रंगकर्मी प्रेमा साखरदांडे यावेळी आठवणींत रंगल्या. ज्याप्रमाणे आजीला नातवंडांच्या आठवणी जास्त येतात; तशा मला ‘चंद्रशाला’च्या आठवणी अधिक येतात. ‘आविष्कार’च्या ‘चंद्रशाला’ या बालविभागात संचालिका म्हणून काम करण्याची संधी मला ‘आविष्कार’ने दिली,

यातच माझ्या जीवनाचा आनंद मला मिळाला. माझ्यातील कलागुणांना आविष्कृत करण्यास ‘आविष्कार’ने वाव दिला. मी ‘आविष्कार’च्या ऋणातून मुक्त होऊ इच्छित नाही; मात्र संस्थेचे स्वतःचे नाट्यगृह व्हावे हे स्वप्न पूर्ण करण्यास मी शक्य तो हातभार लावीन, असे सांगत त्यांनी ‘आविष्कार’ परिवारावर ‘प्रेमा’ची पखरण केली.

या सोहळ्यात, ‘उमगलेले गांधी’चे अभिवाचन रोहिणी हट्टंगडी, चिन्मयी सुमित, विक्रांत कोळपे व दीपक राजाध्यक्ष यांनी केले. ‘आविष्कार’च्या पन्नाशीनिमित्त एका चर्चासत्राचे आयोजनही यावेळी करण्यात आले. यात एकूणच संस्थेच्या पुढील आखणीसंबंधी विचारविनिमय करण्यात आला. पुढील नाट्यमहोत्सव सादर करण्यासाठी आवश्यक असलेल्या विविध कल्पनांविषयीचे विचारही यावेळी मांडण्यात आले. दीपक करंजीकर यांची संकल्पना व लेखन; तसेच कौशल इनामदार यांचे संगीत असलेल्या ‘नादप्रहर’ अर्थात अज्ञाताच्या नादमय वाटेवरची अपार्थिव अक्षरयात्रा, या कार्यक्रमात दीपक करंजीकर, विद्या करंजीकर, अस्मिता पांडे व कौशल इनामदार हे मान्यवर सहभागी झाले होते.

----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

फोटो कॅप्शन : प्रेमा साखरदांडे यांच्याशी संवाद साधताना ‘आविष्कार’च्या अध्यक्षा रोहिणी हट्टंगडी. सोबत सीताराम कुंभार.