मुंबई - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून विश्वासदर्शक ठराव संमत होईल, याबाबतची रणनिती आणि चर्चा आम्ही केलीय. तसेच, भाजपाच्या विधिमंडळ गटाकडून अभिनंदन प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. त्यानुसार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अभिनंदन करण्यात येईल, असे भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी म्हटले आहे. मुंबईत भाजपाच्या सर्व आमदारांची बैठक पार पडली. या बैठकीनंतर शेलार यांनी मीडियाशी संवाद साधला.
जनतेनं महायुतीला जनादेश दिला होता, पण शिवसेनेनं जनादेशाचा अपमान केला. तसेच, ज्या विचारधारेच्या आधारावर महायुती गेल्या 25 वर्षांपासून होती, तो विचारही मित्रपक्षाने सोडला, असे म्हणत शेलार यांनी शिवसेनेवर टीका केली. तसेच, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीपदाची शपथ झाल्यानंतर महाराष्ट्रात आनंदाचे वातावरण निर्माण झालं आहे. समाजातील सर्वच घटकांना एकत्र घेऊन देवेंद्र फडणवीस यांचं सरकार कार्य करेल. आमचा आमच्या आमदारांवर आणि आमच्या आमदारांचा नेतृत्वावर विश्वास, त्यामुळे त्यांना कोणत्याही हॉटेलमध्ये ठेवलेलं नाही, आमदारांवर विश्वास नसलेल्या शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादीवर आमदारांना डांबून ठेवण्याची वेळ आल्याचा टोलाही शेलार यांनी लगावला.