मुंबईमध्ये स्ट्रॉबेरी झाली स्वस्त, आवक वाढल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2018 02:52 AM2018-01-08T02:52:00+5:302018-01-08T02:52:14+5:30
महाबळेश्वर आणि पाचगणी येथून मुंबईत स्ट्रॉबेरीची आवक वाढली असून, मुंबईच्या घाऊक बाजारपेठांत स्ट्रॉबेरीचा अर्धा किलोचा बॉक्स...
मुंबई : महाबळेश्वर आणि पाचगणी येथून मुंबईत स्ट्रॉबेरीची आवक वाढली असून, मुंबईच्या घाऊक बाजारपेठांत स्ट्रॉबेरीचा अर्धा किलोचा बॉक्स ४० ते १०० रुपये दराने विकला जात आहे. तर किरकोळ बाजारपेठेत अर्धा किलोचा बॉक्स ६० ते १२० रुपये या दराने विकला जात आहे.
डिसेंबर महिन्याच्या तुलनेत जानेवारीत स्ट्रॉॅबेरीच्या किमती घसरल्या आहेत. ओखी वादळ आणि अवकाळी पावसाने स्ट्रॉबेरीच्या पिकावर परिणाम झाला होता. मात्र आता स्ट्रॉबेरीच्या पिकासाठी पोषक वातावरण निर्माण झाल्यामुळे बाजारात आवक वाढली आहे. दादर, गिरगाव, घाटकोपर, वाशी, नवी मुंबई येथील बाजारात स्ट्रॉबेरीची आवक जास्त होत असल्याने किमती खाली आल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.
सध्या घाऊक बाजारात दररोज अर्धा किलोचे ३० ते ४० हजार बॉक्स दाखल होत आहेत. काही दिवसांत ही संख्या ५० हजारांच्या आसपास जाईल, असे विक्रेत्यांकडून सांगण्यात आले. त्यामुळे बाजारात आवक वाढली तर घाऊक बाजारातील हलक्या दर्जाच्या स्ट्रॉबेरीची किंमत अर्धा किलोमागे ३० ते ४० रुपये तर चांगल्या दर्जाची किंमत ५० ते ६० रुपये होईल.
महाबळेश्वर आणि पाचगणी या ठिकाणावरून येणाºया स्ट्रॉबेरीला साजेसे थंडीचे वातावरण तयार झाले आहे. यंदा जानेवारी महिन्यात बाजारात आवक वाढली आहे. आवक वाढल्यामुळे किमती कमी झाल्या आहेत. यामुळे ग्राहकांचा खरेदी करण्याकडे कल वाढला आहे. आवक वाढली तर किमती आणखी कमी होतील.
- संजय पानसरे, फळ विक्रेते, घाऊक बाजारपेठा