मुंबई - अंधेरी पश्चिम येथील डी. एन. रोडवरील राजहंस विद्यालयात पहिली इयत्तेत शिकणारा विद्यार्थी मधल्या सुट्टीत शाळेच्या कॅम्पसमध्ये आला. त्यावेळी कॅम्पसमधील भटक्या कुत्र्याने त्याचा चावा घेतला आणि त्यात तो जखमी झाला. खबरदारीचा उपाय म्हणून शाळेच्या प्रशासनाने त्या विद्यार्थ्याला उपचारासाठी दवाखान्यात घेऊन गेले. मात्र, या घटनेनंतर धास्तावलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
१९८२ साली सुरु झालेल्या अंधेरीतील राजहंस विद्यालयाच्या २५ एकर कॅम्पसमध्ये कुत्र्यांचा सुळसुळाट झाल्याने पालक चिंतेत आहेत. हे कुत्रे विद्यार्थ्याला पाहून त्याचा पाठलाग करतात. त्यामुळे विद्यार्थी सुद्धा मनात भीती मनात बाळगून शाळेत जातात. याबाबत या शाळेच्या मुख्याध्यापिका दिपशिका श्रीवास्तव या म्हणाल्या आम्ही बऱ्याच वेळा या कुत्रांच्या नसबंदीकरिता आणि लसीकरणासाठी महापालिकेला पत्रव्यवहार केला आहे. मात्र, भटक्या कुत्रांची हत्या करणे प्रतिबंधात्मक असून या कुत्र्यांची नसबंदी आणि लसीकरणाचे काम महापालिकेने ऍनिमल वेल्फेअर ग्रुप्सला दिले आहे. तरी विद्यार्थ्यांजवळ हे कुत्रे जाणार नाहीत याची आम्ही काळजी घेऊ असे दिपशिका यांनी सांगितले. त्याचप्रमाणे महापालिकेच्या यासंदर्भातील विभागाचे महाव्यवस्थापक डॉ. योगेश शेट्ये यांनी आमचे पथक अशा ठिकाणी जाऊन तात्काळ कुत्रांना लस देते आणि निर्जंतुकरण करतात. मात्र, आम्हाला अदयाप या शाळेबाबत अशी माहिती मिळालेली नाही असे सांगितले.