‘भटक्या कुत्र्यांनी’ मुंबईकर हैराण; सर्वेक्षणानंतर ठोस योजना अपेक्षित

By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2023 10:09 AM2023-05-02T10:09:03+5:302023-05-02T10:10:12+5:30

मुंबईतील कुत्र्यांची नेमकी संख्या कळावी, यासाठी पालिकेने कुत्र्यांचे सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतला होता.

'stray dogs trouble in Mumbai'; A concrete plan is expected after the survey |  ‘भटक्या कुत्र्यांनी’ मुंबईकर हैराण; सर्वेक्षणानंतर ठोस योजना अपेक्षित

 ‘भटक्या कुत्र्यांनी’ मुंबईकर हैराण; सर्वेक्षणानंतर ठोस योजना अपेक्षित

googlenewsNext

मुंबई - शहर आणि उपनगरांत भटक्या कुत्र्यांची संख्या वेगाने वाढत असून  अनेक ठिकाणी मुंबईकरांना त्याचा नाहक त्रास होत आहे. दरम्यान, भटक्या कुत्र्यांचा उच्छाद थांबविण्यासाठी त्यांचे निर्बीजीकरण करण्यापलीकडे काही ठोस उपाययोजनांचा विचार होत नाही.  मात्र त्यासाठीही त्यांची नेमकी संख्या किती आहे याची अद्ययावत माहिती मुंबई पालिकेकडे उपलब्ध नाही. या अद्ययावत माहितीसाठी मुंबई महापालिकेने एप्रिलपासून भटक्या कुत्र्यांची गणना करण्याचा निर्णय घेतला होता आणि तसा प्रस्ताव पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांच्याकडे पाठवण्यात आला होता.

मुंबईतील कुत्र्यांची नेमकी संख्या कळावी, यासाठी पालिकेने कुत्र्यांचे सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतला होता. यंदा जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात त्यास सुरुवात होणार होती. यासाठी पालिकेने आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करणाऱ्या संस्थेशी करार करण्याची प्रक्रियाही सुरू केली होती. 

मुंबईकरांच्या मनात भीती 
रस्त्यांवर, गल्ल्यांमध्ये कुत्र्यांची टोळकी तयार झाली आहेत. पहाटे कामावर जाणारे आणि रात्री उशिरा कामावरून घरी परतणाऱ्यांना या भटक्या कुत्र्यांच्या टोळक्यांकडून खूप त्रास होतो. दुचाकीस्वारांच्या मागे कुत्रे लागत असल्याने त्यांचे अपघात होतात. मुंबई महापालिकेने २०१४ मध्ये भटक्या कुत्र्यांचे सर्वेक्षण केले होते. त्या वेळी मुंबईत ९५ हजारांहून अधिक कुत्र्यांची नोंद झाली होती. दर तीन वर्षांनी हे सर्वेक्षण करणे आवश्यक असते; मात्र गेल्या आठ वर्षांत एकदाही सर्वेक्षण न झाल्याने मुंबईतील कुत्र्यांची नेमकी आकडेवारी किंवा उद्भवलेली समस्या याची माहिती उपलब्ध नाही. दरम्यान, सध्या मुंबईत अडीच लाखांहून अधिक कुत्रे असल्याचा अंदाज आहे.

सर्वेक्षणानंतर ठोस योजना अपेक्षित 
मुंबईतील काही भागांत कुत्रा-मानव संघर्ष वाढला आहे. कुत्र्यांकडून पाठलाग होणे, चावा घेणे तसेच लसीकरण न होणे याबाबतच्या तक्रारी वाढल्या आहेत. त्यासाठी प्रभाग कार्यालय स्तरावर सर्वेक्षण केले जाणार होते. सर्वेक्षणानंतर त्यांच्या वाढलेल्या संख्येचा अंदाज घेऊन तरी पालिकेकडून कठोर उपाय योजले जातील आणि मुंबईकरांची या त्रासापासून सुटका होईल, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत होती. 

Web Title: 'stray dogs trouble in Mumbai'; A concrete plan is expected after the survey

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.