मोकाट कुत्रे आता घेता येतील दत्तक! राज्य सरकार आणणार लवकरच योजना
By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2023 06:09 AM2023-03-04T06:09:21+5:302023-03-04T06:09:36+5:30
प्रताप सरनाईक यांनी मोकाट कुत्र्यांसंदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मोकाट कुत्रे दत्तक घेण्याची योजना राज्य सरकार लवकरच तयार करेल, तसेच, याबाबत योजना तयार करण्यासाठी एक महिन्याच्या आत समिती नेमली येईल, असे पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शुक्रवारी विधानसभेत सांगितले.
प्रताप सरनाईक यांनी मोकाट कुत्र्यांसंदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती. मोकाट कुत्र्यांमुळे होणाऱ्या त्रासापासून लोकांना वाचवा अशी मागणी त्यांनी केली. संजय केळकर,सुनील टिंगरे यांनी मोकाट कुत्रे सामाजिक वा प्राणीप्रेमी संस्थांना दत्तक देण्याची योजना आखा अशी मागणी केली.
मोकाट कुत्र्यांना आसामला न्या...
गुवाहाटीला गेलो तेव्हा माहिती मिळाली की तिकडे कुत्रे खातात त्यामुळे कुत्र्यांना तिकडे सात, आठ हजार रुपयांचा भाव असतो. तिथल्या सरकारशी बोला आणि इकडचे सगळे मोकाट कुत्रे तिकडे नेऊन विका, अशी मजेशीर सूचना माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी केली.
मनेका गांधींचे नाव घेऊन धमक्या देतात; ते थांबवा
काही प्राणीप्रेमी लोक मनेका गांधी यांचे नाव घेऊन धमक्या देत असतात. त्यांना रोखा. माझ्या मतदारसंघातील एका हाउसिंग सोसायटीचे अध्यक्ष आणि सचिवांवर कुत्रा प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आला, असे भाजपच्या मनीषा चौधरी म्हणाल्या.