कोरोना लढ्याचे बळकटीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2021 04:06 AM2021-04-19T04:06:39+5:302021-04-19T04:06:39+5:30

मुंबई महापालिका आणि प्रोजेक्ट स्टेप वन यांचा संयुक्त कार्यक्रम लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : कोरोना रुग्णांचे प्रमाण वाढत असतानाच ...

Strengthening the Corona Fight | कोरोना लढ्याचे बळकटीकरण

कोरोना लढ्याचे बळकटीकरण

Next

मुंबई महापालिका आणि प्रोजेक्ट स्टेप वन यांचा संयुक्त कार्यक्रम

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : कोरोना रुग्णांचे प्रमाण वाढत असतानाच यावर मुंबई महापालिका वेगवेगळ्या स्तरातून उपाययोजना करीत आहे. याचाच एक भाग म्हणून मुंबई महापालिकेने आता गृह विलगीकरण मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. याद्वारे कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी मुंबईकरांनी सहकार्य करावे, असे आवाहन महापालिकेने नागरिकांना केले आहे. गृह विलगीकरण पाठपुरावा हा मुंबई महापालिका आणि प्रोजेक्ट स्टेप वन यांचा संयुक्त कार्यक्रम आहे. त्यानुसार, मुंबई महापालिकेने विभाग नियंत्रण कक्षाचे संपर्क क्रमांक जारी केले आहेत. रोगाची लक्षणे वाढू लागल्यास, जर रुग्णवाहिका/बेडची आवश्यकता असल्यास विभागाच्या नियंत्रण कक्षाशी संपर्क साधता येईल.

आरोग्य सेतू अ‍ॅप डाऊनलोड करून तो सक्रिय स्थितीत ठेवण्यात यावा. हे शारीरिक विलगीकरण आहे. मानसिक विलगीकरण नाही. त्यामुळे परिवारातील सदस्य, मित्र, नातेवाईक यांच्याशी फोन, व्हिडिओ कॉलद्वारे संपर्क ठेवा. टीव्ही बघा. पुस्तके वाचा. कोविडमुळे तणावमुक्त, उदास, एकटे वाटत असल्यास मानसिक स्वास्थ्यासाठी पालिकेच्या प्रशिक्षित सल्लागाराशी संपर्क साधा. कोरोनाची लक्षणे आढळल्यास त्वरित चाचणी करून घ्या. आजारी व्यक्ती, लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांची विशेष काळजी घ्या, असे आवाहन मुंबई महापालिकेने याद्वारे केले आहे.

कोरोना रुग्णांची संख्या वाढली आहे. बाधितांना वैद्यकीय उपचार देताना ऑक्सिजन पुरविण्याची गरज स्वाभाविकच वाढली आहे. महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये, तसेच समर्पित कोविड आरोग्य केंद्रामध्ये प्राणवायू असलेल्या रुग्णशय्या उपलब्ध आहेत. मुंबई पालिका हद्दीतील सर्व २४ प्रशासकीय विभागात प्राणवायू पुरवठा सुरळीत राखता यावा म्हणून, अन्न व औषध प्रशासन, तसेच प्राणवायू उत्पादक आणि संबंधित सहायक आयुक्त यांच्या समवेत समन्वय साधण्यासाठी महापालिकेच्या वतीने सहा समन्वय अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. ते सातत्याने कार्यरत राहणार आहेत. यामुळे प्राणवायू पुरवठ्याबाबतची अडचण निकाली निघण्यास मोलाची मदत होत आहे. भविष्यातही प्राणवायू पुरवठ्यासंबंधी अशी कोणतीही अडचण उद्भवणार नाही, याची पूर्ण खबरदारी पालिका प्रशासनाने घेतली आहे.

दरम्यान, कोरोना संसर्गाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर शासन राबवीत असलेल्या विविध उपाययोजनांसह यासंदर्भातील निर्णय, योजना, उपक्रम आणि आकडेवारीची माहिती जनतेला आता एकाच ठिकाणी मिळणार आहे. यासाठी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या महासंवाद वेबपोर्टलवर ‘लढा कोरोनाशी’ हे सदर कार्यान्वित करण्यात आले आहे.

* सुरुवातीचे धोक्याचे इशारे

श्वास घेताना त्रास होणे

ऑक्सिजनची पातळी ९५ टक्क्यांपेक्षा खाली येणे

शरीराचे तापमान दीर्घकाळ १०० फॅरनहिटपेक्षा जास्त असणे

छातीत दुखणे आणि दीर्घकाळ खोकला होणे

मानसिक संभ्रम आणि झोप येणे

* काय कराल

रक्तदाब/रक्तातील साखरेचे प्रमाण तपासत राहा

शरीराचे तापमान मोजा

इतर लक्षणांची नोंद ठेवा

आरोग्य बिघडल्यास विभागीय नियंत्रण कक्षाला फोन करा

* इतर लक्षणांची तपासणी

घसा खवखवणे

थकवा

अंगदुखी

सर्दी

चव घेण्याची व वास घेण्याची क्षमता नाहीशी होणे

डोके दुखणे

उलटी होणे

पोट बिघडणे

* हे करा

घरातील वारंवार स्पर्श होत असलेल्या पृष्ठभागांना दिवसातून एक ते दोन वेळा स्वच्छ करा

मास्कचा वापर करा

वारंवार हात धुवा

विश्रांती, आहार, पोषण आणि व्यायाम

भरपूर पाणी प्या

कोमट मिठाच्या पाण्याच्या गुळण्या करा

सिगारेट/मद्यपान टाळा

--------------------

Web Title: Strengthening the Corona Fight

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.